सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.  

Updated: Aug 6, 2020, 10:09 AM IST
सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ  title=
संग्रहित छाया

सांगली :  जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झाली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरले आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने  वारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, काखे मांगले आणि कोकरूड रेठरे पुल पाण्याखाली गेले आहेत. 

पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला जाऊ शकतो, त्यामुळे वारणा नदी काठच्या ग्रामस्थांनी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट २ इंचावर आहे.  जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.