Rajgad Fort Pune : शनिवार, रविवारसह सोमवारचा एक दिवस वगळता लागून आलेल्या लाँग विकेंडमुळे राज्यभरात सर्वत्र पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. गड, किल्यांसह सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. मात्र, हाच लाँग विकेंड एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. ठाण्यातील एका तरुणाचा पुणे येथील राजगड किल्ल्यावर मृत्यू झाला आहे. यामुळे गड किल्ल्यांवर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या ठाण्यातील पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. राजगड किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजय मोहनन कल्लामपारा असं मृत्यू झालेल्या 33 वर्षीय पर्यटकाचं नाव आहे.
अजय मोहनन कल्लामपारा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील राहणारा आहे. अजय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करत होता. ठाण्यातील चार पर्यटक रात्री राजगडावर गेले होते. रात्रीच्या सुमारास अजय जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी तोल जाऊन तो पाण्याच्या टाकीत पडला. त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांनी शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. सकाळी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला. त्यानंतर ही घटना समोरं आली.
पुण्यात सिंहगडावर जवळपास 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. सिंहगडावरील तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले होते. त्यातील पाच ते सहा जण बेशुद्ध झाले होते. मधमाशांनी हल्ला केल्यानं पर्यटकांची मोठी धावपळ झाली होती.
अकोलेच्या हरिश्चंद्र गडावर एका पर्यटकाचा थंडीने गारठून एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. 1 जुलै रोजी सहा पर्यटक डोंगरावर चढण्यासाठी पुण्यावरून आले होते. मात्र ,दाट धुक्यामुळे ते रस्ता भरकटले. त्यांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरूवात केली होती. रस्ता चुकल्यामुळे दोन दिवस गडावर अडकून पडल्याने आणि थंडीमुळे त्यांच्यापैकी चौघांची प्रकृती खालावत गेली आणि यातच एकाचा मृत्यू झाला होता.