हेल्मेट न घालताच मंत्री गिरीश महाजनांची बाईक रॅली.. पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं अजब उत्तर

Nashik News : अपघातापासून वाचण्यासाठी सरकारसह पोलिसांकडूनही हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला जात असताना नाशिकमध्ये मंत्र्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. बाईक रॅलीत सहभागी झालेल्या गिरीश महाजन यांनी हेल्मेट काढून बाईक चालवली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 15, 2023, 02:59 PM IST
हेल्मेट न घालताच मंत्री गिरीश महाजनांची बाईक रॅली.. पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं अजब उत्तर title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यत सर्वांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राज्यात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने (BJP) नाशकात (Nashik News) तिरंगा बाईक रॅलीचे (Bike Rally) आयोजन करण्यात आले. होते. मात्र या बाईक रॅलीमध्ये राज्याचे ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे विना हेल्मेट बाईक चालवत असल्याचे पाहायला मिळाले. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता कोणीच हेल्मेट घातले नाही म्हणून मी पण घातले नाही असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली पार पडली. मात्र या रॅलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. रॅलीत सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन तसेच कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट न घालताच दुचाकी चालवली. यावर मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही, म्हणून हेल्मेट घातले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. सगळेच लोकं विनाहेल्मेट आहे, म्हणून हेल्मेट घातलं नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले. मंत्र्यांच्या या उत्तरावर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

"हे शक्तीप्रदर्शन नाही. स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा करण्याचा आजचा दिवस आहे. या जल्लोषामध्ये विशेष करुन तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मोटारबाईक रॅलीमध्ये अनेकजण सहभागी झाले आहेत. एक आगळावेगळा उत्साह शहरामध्येच नाहीतर राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये हेल्मेटची सक्ती नाही. सगळे लोक विनाहेल्मेट जात आहेत. म्हणून मी पण हेल्मेट घातलं नाही," असा अजब दावा मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे.

गिरीश महाजन यांच्यासमोर भाऊ-बहिणीचा आत्मदहनाच प्रयत्न

भूमी अभिलेख विभागाच्या कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमवण्याची वेळ आल्यामुळे संबंधित विभागाकडून न्याय मिळाला नाही म्हणून चांदवड तालुक्यातील योगेश खताळ व त्यांची बहीण अश्विनी खताळ यांनी महसूल आयुक्त कार्यालयासमोर मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.