Minor Kills Grandmother In Delhi: दिल्ली हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा हादरली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी 77 वर्षाच्या वृद्ध महिलेची हत्या केली आहे. दोन आरोपींपैकी एक या वृद्ध महिलेचा सख्खा नातू असल्याचे समोर आले आहे. तर, एक आरोपी त्याचा मित्र असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे दोघेही आरोपी अल्पवयीन असून पैशांसाठी ही हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे 14 हजार रुपये जप्त केले आहेत.
महिलेच्या पतीने शुक्रवारी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या पतीचे वय जवळपास 80 वर्ष इतके आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तर, शनिवारी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसंच, त्यांच्याकडून काही रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
महिलेच्या पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पेन्शनचे पैसे आणण्यासाठी ते बाहेर गेले जाणार होते. त्यामुळं त्यांनी त्यांच्या नातवाला आजीसोबत थांबायला सांगितले होते. दुपारी घरी परत आल्यानंतर त्यांनी पत्नीला संध्याकाळच्या चहासाठी उठवायचा प्रयत्न केला. मात्र, तिने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांना जाणवले की त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. डीसीपी सुरेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.
महिलेचे वय जास्त असल्याने सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे वाटत होते. तसंच, शरीरावर जखमांच्या खुणाही नव्हता. मात्र, जेव्हा नातेवाईक आले तेव्हा त्यातील एकाने महिलेच्या कपाळावर जखम असल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा तिच्या पतीने घरातील लॉकर चेक केला. लॉकरमधून काही रक्कम चोरीला गेल्याचे समोर येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अखेर नातवाने गुन्हा कबुल केला आहे. आजोबांच्या गैरहजेरीत त्याला घरातील पैसे चोरायचे होते. त्याचवेळी त्याचे लक्ष पलंगावर झोपलेल्या आजीकडे गेले. तेव्हा त्याने ब्लँकेटने आजीचा गळ आवळला आणि तिथेच असलेल्या एका वस्तुने आजीच्या डोक्यावर प्रहार केला.
आजीच्या हत्या केल्यानंतर त्याचा मित्र घरातील बाथरुममध्येच लपला होता. नंतर, दोघही संधी साधून घरातून पळून गेले. मयत महिलेचा नातू त्याच परिसरात दुसऱ्या घरात आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत होता. मात्र, आई-वडिल त्याला खर्चासाठी पैसे देत नसल्याने त्याने ही हत्या केली आहे. दोघेही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.