हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन घमासान होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी सभागृबाहेर अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात एका वेगळ्याच मुद्द्यावरुन शाब्दिक युद्ध रंगलं आहे. अजित पवारांनी वाढलेल्या पोटाचा अशी टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्या वाढलेल्या ढेरीचा फोटो शेअर केला होता. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना याबाबत विचारलं असता त्यांच्या उत्तराने एकच हशा पिकला.
कर्जत येथे पार पडलेल्या वैचारिक मंथन मेळाव्यात अजित पवारांनी सूचक पद्धतीने वरिष्ठ असा उल्लेख करत शरद पवारांच्या धोरणांबद्दलचे आपले आक्षेप भाषणामधून मांडले होते. याच भाषणामध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यासाठी काही लोकांना घेऊन आंदोलन करण्याचे निर्देश देण्यात आले होते असा दावा अजित पवारांनी केला. याचवेळी बोलताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाला उल्लेख करत मिश्कील टिका केली होती.
#LIVE : #नागपूर | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद https://t.co/iHiaUOSUd0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2023
अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला. आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन आव्हाड यांनी अजित पवारांचा एका कार्यक्रमातील फोटो शेअर करत ढेरी वाढल्याचं दाखवलं. "दादा त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 पॅक अॅब्स केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो," असा टोला त्यांनी फोटो शेअर करत लगावला.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी मिश्कील उत्तर दिलं. ते म्हणाले की, "आता पोट वाढलंय तर मी काय करु. वाढलं तर वाढलं, पण ते नुसतं वाढलं आहे त्यात महिना कोणता गेलेला नाही एवढं लक्षात ठेवा".
अजित पवारांचं हे उत्तर ऐकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरत नव्हतं.