कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला

राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबेना  

Updated: May 10, 2019, 04:57 PM IST
कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला title=

दीपक भातुसे, झी मीडिया. मुंबई : राज्यात कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतानाच दिसतोय. चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात राज्यात ६११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने जून २०१७ मध्ये कर्जमाफी करण्याची घोषणा केली. 36 हजार कोटींच्या या कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार हलका होईल आणि ते आत्महत्येकडे वळणार नाहीत अशी अपेक्षा होती. मात्र कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. उलट या आत्महत्या वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

दिवसाला ६ शेतकऱ्यांची आत्महत्या

झी २४ तासकडे उपलब्ध झालेल्या शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीनुसार २०१९ या चालू वर्षातील जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या पहिल्या तीन महिन्यात राज्यात ६११ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या केल्यानंतर शेतकरी कुटुंबियांना मिळणाऱ्या शासकीय मदतीसाठी यातील १९२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंब पात्र ठरली आहेत. तर उर्वरित आत्महत्येंची त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे.

पहिल्या ३ महिन्यात ६११ शेतकऱ्यांची आत्महत्या

राज्यात दुष्काळाची तीव्रता असलेल्या बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून पहिल्या तीन महिन्यातील हा आकडा ३९ इतका आहे. विभागवार आकडेवारी बघितली तर अमरावती विभागात सर्वाधिक २२७, औरंगाबाद विभागात १९८, नाशिक विभागात ११९, नागपूर विभागात ३७ आणि पुणे विभागात २९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबेना

आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. कर्जमाफीपासून ते पीक विमा, शेततळे, अनुदान यांचा त्यात समावेश आहे. मात्र या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचं राज्यात चित्र आहे.