फडणवीस यांचा राऊत यांच्यावर हल्लाबोल, ही किडक्या डोक्याच्या लोकांची स्क्रिप्ट...

काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली. असं करणाऱ्या लोकांना 

Updated: May 29, 2022, 12:19 PM IST
फडणवीस यांचा राऊत यांच्यावर हल्लाबोल, ही किडक्या डोक्याच्या लोकांची स्क्रिप्ट...  title=

नागपूर : शाहू महाराज ( Shahu Maharaj ) आमचे छत्रपती आहेत. आम्ही त्यांना मानतो. त्यामुळे त्यांच्या गादीचा मान राखून त्यांनी काही मत व्यक्त केले असेल तरी त्यावर मी काही बोलणार नाही. संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chtarpati ) यांनी याबाबत ट्विट केले. ती प्रतिक्रिया बोलकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj )  यांना स्मरून सांगतो, जे बोललो ते सत्य बोललो ही त्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली. असं करणाऱ्या लोकांना समजत नाही. अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत. दुसरीकडे महाराज आणि युवराज यांच्यामध्ये अंतर आहे असं दाखवत आहेत. अशा लोकांच्या  वागण्याबद्दल मला प्रचंड दुःख आहे, असे ते म्हणाले.

छत्रपती संभाजीराजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षात चांगलं तयार होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाज यांच्यात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होत आहे. अशा प्रकारचं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रात तयार होत असताना त्याचे कोणते नुकसान भाजपाला होणार नाही. त्याचे नुकसान कोणाला होणार हे मला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे असं नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. 

युवराज संभाजीराजे यांनी आभार मानण्यासाठी माझी भेट घेतली होती. तत्पुर्वी त्यांनी स्वराज्य पक्षाची घोषणा केली होती. त्या भेटीत त्यांनी मी कुठल्याही पक्षाचे टिकीट घेणार नाही अशी घोषणा केली होती. आमच्या घराण्याची परंपरा पाहून सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मला अपक्ष म्हणून सर्व पक्षांनी समर्थन करावे, असे त्यांनी सांगितले होते. 

त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की सगळे जण समर्थन देणार असतील तरी आमचा निर्णय माझ्या हातात नसतो. मात्र, हायकमांडसोबत चर्चा करून नक्कीच तुमच्यासाठी समर्थन प्रयत्न करील, असे त्यांना सांगितले होते अशी माहिती देतानाच जे असे राजकारण करता आहेत ते उघडे पडतील, असा इशारा त्यांनी दिला.