close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मी पुन्हा येईन'; मुख्यमंत्र्यांना विश्वास

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापुरात सांगता झाली.

Updated: Sep 1, 2019, 09:49 PM IST
'मी पुन्हा येईन'; मुख्यमंत्र्यांना विश्वास
फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस ट्विटर

सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापुरात सांगता झाली. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास बोलून दाखवला. अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं त्यांच्या भाषणात सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. कृष्णा आणि भीमा नद्या जोडणी प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

'पराभवानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुधारले नाहीत. आम्हाला जनतेने नाही तर ईव्हीएम मशिनने हरवलं असं सांगतात. २००४ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुका ईव्हीएमवर झाल्या, या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्यात. तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, पण जेव्हा मोदींनी धोबीपछाड दिला तेव्हा ईव्हीएम वाईट झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, पण जयसिद्धेश्वर महाराज निवडून आले तर ईव्हीएम वाईट, हा कोणता न्याय आहे?', असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. ईव्हीएम खराब नाही, तर तुमची खोपडी खराब आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सोहळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  यामध्ये जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचा समावेश होता.

जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्याच्या माण-खटावमधून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. पण त्यांनी ३० ऑगस्टरोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. राणा जगजित सिंग हे कळंब उस्मानाबाद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राणा जगजित सिंग हे मुंबईमध्ये त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. तर कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले धनंजय महाडिक यांनीही हातात भाजपचा झेंडा घेतला.