'नवाब मलिक महायुतीत नको', देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना जाहीर पत्र, म्हणाले 'देशद्रोह्यांशी संबंध...'

नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र नवाब मलिक महायुतीत आल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असून, त्यांनी अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 7, 2023, 07:14 PM IST
'नवाब मलिक महायुतीत नको', देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना जाहीर पत्र, म्हणाले 'देशद्रोह्यांशी संबंध...' title=

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र यानिमित्ताने नवाब मलिक महायुतीत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून, त्यांनी अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर हे पत्र शेअर केलं असून, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. 

नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असं आमचं मत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी आशाही फडणवीसांनी व्यक्त केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात काय लिहिलं आहे?

श्री. अजितदादा पवार,

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर

नवाब मलिक हे आज सकाळीच विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये भेटीसाठी गेल्याचं दिसून आलं. अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे.