Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. आमच्या कुटुंबापर्यंत जाऊ नका असा इशारा उद्धव ठाकरेंनी विद्यमान गृहमंत्र्यांना दिला. या इशाऱ्याला फडणवीस यांनीही कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी ठाकरेंच्या आव्हानावर पहिली प्रतिक्रिया नोंदवत एक पोस्ट सोशल नेटवर्किंगवर केली आहे. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे 'हास्यजत्रा' होतं असा टोला लगावतानाच 'बालबुद्धी' असं म्हटलं आहे.
"करोना काळातील घोटाळ्याच्या नावे सध्या बोभाटा सुरु आहे. सूरजच्या घरावर धाड टाकली. तो एक साधा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाला धक्का असं बोललं जात आहे. यांच्या मनात किती भीती बसली आहे. मी पाटण्याला गेलो तर लगेच फडणवीस हे परिवार बचाओ बैठकीला गेलेत असं म्हणाले. या पातळीवर येऊ नका. देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. तुमच्या परिवाराचे काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. त्यावर बोलावं लागलं तर नुसतं शवासन करावं लागेल. इतर आसनं तुम्हाला झेपणार नाहीत. त्यामुळे माझ्या परिवारावर बोलू नका. त्याबद्दल मी संवेदनशील आहे. संपूर्ण महाराष्ट्र, शिवसैनिक माझा परिवार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. आता तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कोणी दुसरं घेत असेल तर मला माहिती नाही," असं उद्धव यांनी फडणवीस आणि भाजपाला टोला लगावताना आज दादरमधील कार्यक्रमात बोलताना केलं.
ठाकरेंनी केलेल्या या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका," असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
"चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा," असं म्हणत फडणवीस यांनी ट्वीटमध्ये एक यादीच पोस्ट केली आहे. या यादीमध्ये त्यांनी खालील मुद्द्यांचा समावेश केला आहे.
> सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर...
>मुंबईला कुणी लुटले यावर...
>मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर...
>100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर...
"तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या... बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…", असा टोला या पोस्टच्या शेवटी लगावत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.