औरंगाबादमधील दंगल राजकीय हेतूने घडवली: धनंजय मुंडे

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात दंगली घडवून आणल्या जातील असं विधान केलं होतं. औरंगाबादच्या दंगलीवरुन हे खरं वाटू लागल्याची प्रतिक्रियाही मुंडेंनी दिलीय. 

Updated: May 16, 2018, 11:29 AM IST
औरंगाबादमधील दंगल राजकीय हेतूने घडवली: धनंजय मुंडे

औरंगाबाद: विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबादच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुंडेंनी स्थानिकांशी संवाद साधला. औरंगाबादमधील दंगल धार्मिक नव्हती तर राजकीय हेतूने घडवून आणलेली होती असा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय. काही राजकीय नेत्यांनी आपले स्वार्थ साधण्यासाठी ही दंगल घडवून आणल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय. औरंगाबादमधील घटनेमुळे पुन्हा एकदा सरकार आणि गृह विभागाचे अपयश असल्याचं मुंडे म्हणाले. विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असल्याचा इशाराही मुंडेंनी दिलाय.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षांकडून राज्यात दंगली घडवून आणल्या जातील, असं विधान करत शक्यता वर्तवली होती. औरंगाबादच्या दंगलीवरुन हे खरं वाटू लागल्याची प्रतिक्रियाही धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

पोलिसांकडून नेत्यांची धरपकड सुरू

दरम्यान, औरंगाबादममध्ये झालेल्या दंगलप्रकरणी आता पोलिसांनी नेत्यांची धरपकड करायला सुरुवात केलीय. शिवसेना नगरसेवक आणि माजी सभगृह नेते राजेंद्र जंजाळ यांन पोलिसांनी अटक केलीय. सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात कारला आग लावणारा इसम जंजाळ असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळं त्यांच्या घरी त्यांना अटक करण्यासाठी मोठा फौजफाटा गेला. मात्र जंजाळ यांना अटक होत असल्याची बातमी पसरल्यानं त्यांच्या घराबाहेर मोठा जमाव जमा झाला होता. मात्र पोलिसांनी चौकशीसाठी म्हणून त्यांना पोलिस ठाण्यात नेलं आणि अटक करण्यात आली. यानंतर अनेक भागातील बाजारपेठा पुन्हा बंद झाल्यात. 

एआयएमआयएम नेत्याला अटक

दरम्यान, एमआयएम पक्षाचे नेते आणि पालिका विरोधी पक्ष नेता फिरोज खानलाही अटक करण्यात आलीय. दंगलीचा संशयित म्हणून पोलीस शोध घेत होते. संध्याकाळच्या सुमारास फिरोज खान स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले. यानंतर जंजाळ आणि फिरोज खान या न्यायालयात हजर करण्यात आलं. दोघांनाही 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. दरम्यान दंगली प्रकरणी आणखी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची धरपकड होण्याची शक्यता आहे.