ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : धाराशिवमध्ये (Dharashiv News) भर चौकात झालेल्या तरुणाच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. शेतातील बांधाच्या वादावरुन तीन ते चार जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (Dharashiv Crime) केली आहे. धाराशिवमध्ये भर दिवसा चौकात घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी (Dharashiv Police) या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. आनंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रामेश्वर किसन मोहिते असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. रामेश्वर मोहिते हा बुधवारी कामानिमित्त धाराशिव शहरात आला होता. दुपारी गावाकडे जात असताना तीन ते चार जणांनी रामेश्वरला सांजा रोड येथील भवानी चौकात थांबवले आणि शेतातील बांधावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी रामेश्वरवर चाकू आणि तलवारीने वार करत त्याची हत्या केली. आरोपींनी रामेश्वरचे हातपाय तोडले. गंभीर जखमी झाल्याने रामेश्वरचा रस्त्यावर अक्षरशः तडफडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर रामेश्वरच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रामेश्वरच्या हत्येनंतर आनंदनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भर चौकात झालेल्या या खुणामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दुसरीकडे रामहरी पडवळ आणि दशरथ पडवळ यांच्या मुलांनी मिळून ही हत्या केली आहे. आनंदनगर, खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांनीच आमच्यावर दावा केला. आनंदनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यापासून आम्हाला धोका असल्याचे सांगितले होते, असे रामेश्वरच्या नातेवाईंकाने सांगितले. तर विनाकारण माझ्यावर अन्याय करण्यात आला आहे. चौघे पाच जण तलवारी घेऊन घरी आले होते. आम्ही घरी होतो म्हणून ते पुन्हा आले नाहीत, असे रामेश्वरच्या वडिलांनी सांगितले.
नेमकं काय झालं?
रामेश्वरचे वडील किसन मोहिते यांचा शेतीचा व्यवसाय आहे. मोहिते यांचा शेजारी असलेल्या रमेश पडवळ, रामहरी पडवळ, रणजीत सूर्यवंशी यांच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी शेतात दगड टाकल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. याच वादावरुन हाणमारी देखील झाली होती. याप्रकरणी रामेश्वर मोहिते याने आनंद नगर पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी आरोपींकडून पैसे घेऊन तक्रार घेतली नाही असा आरोप रामेश्वरच्या नातेवाईकांनी केला होता. या सर्व प्रकारामुळे रामेश्वर घाबरून गावाबाहेर गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो गावात आला होता.
बुधवारी रामेश्वर कामानिमित्त धाराशिव शहरात आला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला सांजा चौकात गाठले आणि चाकू आणि तलवारीने त्याचे हातपाय तोडून खून केला. रामेश्वर रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडून होता. या घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मोहिते कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रामेश्वरला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.