Pune Crime : गुलाबजामवरुन लग्नात पेटला वाद; लोखंडी झाऱ्याने जोरदार हाणामारी

Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नसोहळ्याला या सर्व प्रकारामुळे गालबोट लागलं आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 27, 2023, 12:14 PM IST
Pune Crime : गुलाबजामवरुन लग्नात पेटला वाद; लोखंडी झाऱ्याने जोरदार हाणामारी title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लग्नात (Wedding) मानापमानावरुन अनेकदा वधू आणि वर पक्षामध्ये छोटेमोठे वाद झाल्याचे आपण पाहिलं असेल. कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की हाणमारी देखील होते. मात्र पुण्यातल्या (Pune News) एका लग्नात या हाणामारीला कारण ठरलं आहे  गुलाबजाम (Gulab Jamuns). पण ही हाणामारी नातेवाकांमध्ये झालेली नसून जेवण बनवणाऱ्या केटरर्स व्यवस्थापक आणि नातेवाईकांमध्ये झाली आहे. लग्नात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून नातेवाइक व केटरर्स व्यवस्थापक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना पुण्यात  घडली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

पुण्यातील हडपसरच्या शेवाळेवाडी येथे मंगळवारी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हाणामारीत जखमी झालेल्या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक दिपांशु गुप्ता (26, रा. राजयोग मंगल कार्यालय, शेवाळेवाडी) यांनी  फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात लोखंडे आणि कांबळे परिवारांचा विवाह सोहळा होता. या लग्नसोहळ्यातील केटरिंगचे काम फिर्यादींकडे होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास वर पक्षाकडील व्यक्तीने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे केटरिंगचे व्यपस्थापकाला सांगितले. त्यावेळी दिपांशु गुप्ता यांनी तुम्ही जेवण घेवण घेऊन जाऊ शकता काही हरकत नाही असे सांगितले. गुप्ता यांनी हरकत नसल्याचे सांगितल्यावर वर पक्षातील त्या व्यक्तीने नातेवाइकांसह राहिलेले जेवण डब्यात भरण्यास सुरुवात केली.

त्यावेळी एक जण डब्यामध्ये तिथे असलेले गुलाबजाम भरू लागला. मात्र त्यावेळी गुप्ता यांनी त्यास विरोध केला.'हे गुलाबजाम तुमचे नाहीत. उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे ते घेऊन जाऊ नका,' असे गुप्ता यांनी सांगितले. यावरुनच गुप्ता यांचा वर पक्षातील लोकांसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. वर पक्षाकडील लोकांनी शाब्दिक वाद वाढवून तिघांनी गुप्ताला मारहाण केली. तसेच गुप्ता यांना लोखंडी झारा मारून जखमी केले. या सर्व प्रकारानंतर मंगल कार्यालयाचे मालक तिथे आले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.

या सर्व प्रकारानंतर दिपांशु गुप्ता यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हडपसर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन आरोंपीचा शोध सुरु केला आहे.