दोन महिन्यांपासून पेशाने वकील असलेले धवड पत्नीसह बेपत्ता

एक दाम्पत्य दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यांच्या अशा अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांसोबत शेजारीही चिंताग्रस्त आहेत. 

Updated: Oct 4, 2018, 10:51 PM IST
दोन महिन्यांपासून पेशाने वकील असलेले धवड पत्नीसह बेपत्ता  title=

नागपूर : एक दाम्पत्य दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यांच्या अशा अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांसोबत शेजारीही चिंताग्रस्त आहेत. तर बेपत्ता धवड दाम्पत्याविषयी कुठलेही धागे -दोरे सापडत नसल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.

नागपूरच्या वंजारीनगर परिसरातील 'लक्ष्मी प्रयाग'मध्ये धवड दाम्पत्य राहत होते. ६२ वर्षीय भैय्यासाहेब धवड हे वाहन विमा दाव्यांसाठी नागपुरातील विख्यात वकील तर ५५ वर्षीय पत्नी वनिता या गृहिणी. सोसायटीतील मनमिळावू कुटुंब म्हणून त्यांची ओळख. २९ जुलैची ती रात्र. भैय्यासाहेब आणि वनिता कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळायला ५ दिवसांचा कालवधी लागला. भेय्यासाहेब यांचा मुलगा मृणालने पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलीस सोसायटीमध्ये चौकशी करिता आल्यावर धवड दाम्पत्य बेपत्ता असल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली.

पेशाने वकील असलेले भैय्यासाहेब यांचे कुटुंब तसे छोटेच. मुलगा मृणाल हा वाशीममध्ये एका बँकेत नोकरी करतो..२९ जुलैच्या रात्री त्यांचा मुलगा मृणाल हा घरीच होता. सकाळी उठल्यावर आई-वडील घरी नसल्याचे त्याला समजले. घराबाहेर पडताना धवड पती-पत्नीने सोबत काहीच नेले नाही. मोबाईल फोन, आधार कार्ड, ओळख पत्र, डेबिट-क्रेडीट कार्ड,पैसे इतकेच नाही तर चप्पल, चष्मा व दररोज लागणारी औषधे देखील त्यांनी घरीच जशीच्या तशी सोडली. त्यामुळे असे अचानक काय घडले की धवड पती-पत्नी अचानक बेपत्ता झाले हे कळायला मार्ग नाही.

त्यामुळे धवड दाम्पत्य अचानक आणि कोणालाही न सांगता कुठे गेले हे गूढ उकलण्यास पोलिसांनाही आव्हानात्मक होऊन बसले आहे. जिल्हा,राज्य व बाहेरील राज्यातही पोलिसांनी धवड दाम्पत्याचा चौकशी केली मात्र अजून काहीच तपास न लागल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अधिक वाढत आहे. 

नवीनच लग्न झालेल्या मुलाचे त्याच्या पत्नी सोबत पटत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तणावातून तर धवड पती-पत्नी तर निघून गेले नाही ना, असाही संशय उपस्थित होतो. एखाद्या गुप्त यात्रेकरिता निघून गेल्याच्या काहींचा अंदाज आहे. तर धवड दांपत्यांचे काही बरे-वाईट तर झाले नाही ना असाही संशय आहे. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने ते कुठल्या दिशेने गेले हे देखील कळायला मार्ग नाही. कुठलाच पुरावा मागे न ठेवता धवड पती-पत्नीचे असे बेपत्ता होने पोलिसांनाही आव्हानात्मक ठरत आहे.