प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : खान्देशात एका नव्या नवरीची सध्या चर्चा आहे. लग्नमंडपात लग्न लागलं... अक्षता पडल्या... त्यानंतर ही नवरी धावतच मंडपाच्या एका बाजूला गेली... आणि तासभर तिथंच सोफ्यावर बसून राहिली. जेव्हा कारण कळलं. तेव्हा सगळ्य़ाच वऱ्हाडींनी नववधूचं कौतुक केलं.
हळद पिवळी पोर कवळी.... अशी ही नववधू तिच्या हळदीला नाचत होती. उंटावद गावातल्या शुभांगी आणि स्वप्नीलचं लग्न ठरलं. लग्नाची तारीख ठरली. सगळी तयारी झाली आणि तेवढ्यात बीएससीच्या दुसऱ्या वर्गात शिकत असणाऱ्या शुभांगीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली.
लग्न आणि परीक्षा एकाच दिवशी आली. फिजिक्स इलेक्ट्रोनिकचा ६० मार्कांचा पेपर नेमका त्याच दिवशी होता... मग लग्नाची तारीख मागे-पुढे करण्यासाठी चर्चा सुरू झाली. पण पत्रिका वाटून झाल्या होत्या, बरीच तयारी झाली होती. अखेर लग्नाच्य़ाच दिवशी परीक्षा देण्याचा समंजसपणा शुभांगी आणि स्वप्नील दोघांनीही दाखवला.
मग काय... सकाळी लग्नाचे अर्धे विधी झाले.... लग्न लागलं. अक्षता पडल्या.... आणि लगेचच नववधू सोफ्यावर सोफ्यावर जाऊन बसली. तिनं लग्नमंडपातच ६० मार्कांचा तासाभराचा ऑनलाईन पेपर दिला.
शुभांगीची परीक्षा देऊन झाल्यावर लग्नाचे पुढचे विधी पार पडले. शुभांगीच्या या शिक्षणप्रेमाचं आणि तिला नवऱ्यानं दिलेल्या साथीचं व-हाडींनीही कौतुक केलं. ही खरी सावित्रीची लेक... आता लग्न झाल्यावरही शुभांगीनं शिक्षण पूर्ण करावं ही सदीच्छा व्यक्त करण्यात येतेय.