मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात कि २५ वर्ष युतीत सडलो. मात्र, २०१२ पर्यंत या युतीचे नेते वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांच्या हयातीत युती कायम होती. मग, तुम्ही बाळासाहेब यांच्या निर्णयावर बोट दाखवीत आहेत का? भाजपबरोबर शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले का? असं तुमचं म्हणणं आहे का? असा सवाल आमच्या मनात येत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली होती. त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये तेच ते मुद्दे आहेत. आता ते मुद्दे शिवसैनिकांना पाठ झाले असतील. सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर त्यांच्या भाषणात पहायला मिळाले असा टोला त्यांनी लगावला.
तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचे आमदार होते
१९८४ ला लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढविली होती शिवसेनेच्या नाही. माजी मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी ती निवडणूक लढले होते. भाजप सोबत सडलो असे सांगतात. मग, भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले आणि आता भाजपाला सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचे पक्ष झालात. मग नेमकं कुणासोबत सडलात असा खरमरीत सवालही फडणवीस यांनी यावेळी केला.
शिवसेनेचे हिंदुत्व कागदावरचे...
राम जन्मभूमीच्यावेळी लाठ्या, काठ्या, गोळ्या खाणारे आम्ही आहोत. त्यावेळी तुम्ही तोंडातली वाफ दडवत होतात. राम मंदिर, बाबरी हे विषय सोडून द्या. पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर करून दाखवलं. पण, तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आताही कल्याण दुर्गवाडीचा प्रश्न सोडवू शकले नाही. श्री मलंग गडाचा प्रश्न सोडवू शकले नाही. उस्मानाबादचे धाराशिव झाले नाही. हिंदुत्त्वाच्या कशाला गप्पा मारताय? तुमचं हिंदुत्व कागदावरचे आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केली.