close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बाहेरून येणाऱ्यांची निश्चित मदत घेऊ, वळसे-पाटील यांचे सूचक विधान

भाजपचे नेते आणि माजी मंत्री नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत.

Updated: Jan 14, 2019, 07:54 PM IST
बाहेरून येणाऱ्यांची निश्चित मदत घेऊ, वळसे-पाटील यांचे सूचक विधान

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर चालणारा पक्ष आहे. पण बाहेरुन कुणी आले तर त्यांची निश्चित मदत घेऊ, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी जळगावात केले. भाजपचे नेते आणि माजी मंत्री नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच कोणी एका पक्षाचा टिळा लावून आलेला नसतो, असे त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. त्यामुळे दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या विधानाला महत्त्व आले आहे. 

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी हे विधान केले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर साधारण गेली तीन वर्षे त्यांच्याकडे कोणतेच पद देण्यात आलेले नाही. आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे खडसे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी कोणी एका पक्षाचा टिळा लावून आलेला नसतो, असे वक्तव्य जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे लेवा समाजाच्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यामध्ये केले होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांच्या सूचक वक्तव्याला महत्त्व आले आहे. 

मे २०१८ मध्ये भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी राज्य शासनाचे कोणतेही नुकसान न झाल्याचा अहवाल देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना क्लीनचिट दिली आहे.