close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती हवी - दानवे

युतीबाबत पुन्हा चर्चा

Updated: Jan 14, 2019, 05:27 PM IST
मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती हवी - दानवे

कोल्हापूर : मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. युतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे असताना ठरला होता. त्यानुसार ही चर्चा राज्य पातळीवर होणं गरजेचं असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. याआधी जालन्यात त्यांनी म्हटलं होतं की, 'शिवसेना बाहेर काहीही बोलत असली तरी वाद बाहेर होतात. मंत्रिमंडळातील निर्णय सर्वसंमतीने होतात.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. भाजप युतीच्या बाजूने आहे. हे आम्ही जाहीरपणे सांगतो आहे, असेही दानवे म्हणाले.

शिवसेनेच्या भाषेवर आमचा आक्षेप नाही. युतीसंदर्भात कोणताही नवा प्रस्ताव नाही. फक्त बसायचे आणि युतीची घोषणा करायची इतकेच बाकी आहे. मात्र युती करायची की नाही हे शिवसेनेवर अवलंबून असल्याचे देखील दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे युतीचा चेंडू भाजपने शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे. पण युतीचे नंतर बोलू आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अशी शिवसेनेची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली होती. असे असताना दानवे यांनी पुन्हा युतीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याचीच चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.