Mahavikas Aghadi Controversy : राज्याच्या आणि देशाच्या रजाकारणात लक्षवेधी घडामोडी घडल्या आहेत. त्यातीलच एक महत्वाची घडामोड आहे ती महाविकास आघाडी संदर्भातील. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अंतर्गत धुसपुस सुरु असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांमधील हे अंतर्गत चव्हाट्यावर देखील येतात. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP chief Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे. पवार-ठाकरे यांच्या मतभेदामागे अनेक कारण आहेत (Maharashtra Politics ).
शरद पवारांकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं. पवारांच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले हेही जगजाहीर आहे. राष्ट्रीय पातळीवर मोदींविरोधी आघाडी उभी करण्यातही पवारांची भूमिका निर्णायक आहे. मात्र गेल्या काही दिवसात पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांचीच कोंडी झाल्याचं दिसत आहे.
पवारांच्या गुगलीमुळे ठाकरे-पवारांमध्ये मतभेद झाल्याचीही चर्चा आहे. अदानीप्रकरणी जेपीसी मोदींची डीग्री यावरुन पहिल्यांदाच पवार आणि ठाकरे आमनेसामने आले आहेत. संजय राऊतांनी तर अप्रत्यक्ष शब्दात पवारांबद्दलची नाराजी बोलून दाखवली आहे. 'सुप्रीम कोर्टाची चौकशी समिती हवी असे शरद पवार म्हणाले. अदानींना वेगळा न्याय का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मोदींच्या डिग्रीवरुनही विरोधक आक्रमक झाले असताना पवारांनी वेगळी भूमिका घेतली. पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांच्या मुद्द्यातली हवाच काढली गेल्याची चर्चा आहे. दरम्यान आपने मात्र डिग्रीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरु केले आहे. 'डिग्री महत्त्वाची की शेतकरी? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी आक्रमक झाले असतानाही पवार-शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली आहे. सावरकरांबाबत मतभेद असू शकतात. मात्र, सावरकरांच्या त्यागाविषयी दुर्लक्ष करून चालणार नाहीअशी भूमिका पवारांनीही झी २४ तासशी बोलताना घेतली. त्यात आता अदानीप्रकरणी जेपीसी चौकशी आणि मोदींच्या डिग्रीवरुनही पवारांनी नेमकी उलट भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे-पवारांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे पवारांच्या भूमिकेमुळे महाआघाडीची बिघाडी होतेय की काय अशी भितीही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.