Dombivali Crime News Dowry Death: मुंबई उपनगरामधील संस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीमधील एका नवविवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मृत महिलेच्या पोलीस हावलदार पतीला आणि त्याच्या आईला अटक केली आहे. मृत तरुणीने आत्महत्येआधी मोबाईलमध्ये लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नवरा आणि सासूला तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीमधील मानपाडा पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
राहत्या घरामध्ये पाणी भरायच्या ड्रमवर चढून घरातील सिलींग फॅनला गळफास लावून आयुष्य संपवणाऱ्या मुलीचं नाव जागृती असं आहे. जागृती ही मूळच्या भुसावळमधील कुऱ्हे पाना गावचे गजानन भिका वराडे यांची कन्या होत्या. एप्रिल महिन्यामध्येच तिचं लग्न झालं होतं. जळगावमधील पिंप्राळामधील सागर बारी नावाच्या 32 वर्षीय तरुणाशी तिचं लग्न झालेलं. 20 एप्रिल रोजी झालेल्या या लग्नासाठी वडिलांनी 7 लाखांचा खर्च केला होता. मात्र लग्नामध्ये सोनं-नाण्याच्या भेटवस्तू दिल्यानंतरही जागृतीच्या सासरकडून हुंड्याची मागणी होऊ लागली. मुंबईमध्ये घर घेण्यासाठी 10 लाख रुपये देण्याची मागणी बारी कुटुंबाने केली. मात्र मुलीच्या वडिलांनी असमर्थता दर्शवत काही काळाने जमेल तसे पैसे देऊ असं सांगितलं.
लग्नानंतर दोन महिन्यांनी जागृती डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील आडीवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंट येथे सागरच्या घरी राहण्यास आली. मात्र सागर आणि त्याच्या आईकडून तिचा हुंड्यासाठी सतत छळ केला जायचा. जागृतीला तिचा पती आणि सासू, 'तुझे ओठ काळे आहेत', 'तुझ्या तोंडाचा घाण वास येतो' असं वारंवार बोलून हिणवायचे. या सततच्या टोमण्यांमुळे त्रासलेल्या जागृतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. मात्र आत्महत्येपूर्वी जागृतीने मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती. तिने आपल्या आत्महत्येसाठी आपली सासू आणि पतीला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. त्यांनी जागृतीचा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांना अटक केली आहे.
गावावरुन डोंबिवलीमध्ये राहायला आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये म्हणजेच 5 जुलै रोजी जागृतीने ससरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी सुसाईड नोट वरून गुन्हा दाखल करून सागर आणि त्याच्या आईला अटक केली आहे. जागृतीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट होती. तिच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर मोबाईल उघडून पोलिसांनी या सुसाईड नोटच्या आधारे आरोपींना अटक केली. या सुसाईड नोटमध्येच जागृतीने तिला काय टोमणे मारले जायचे आणि कशाप्रकारे मानसिक, शारीरिक त्रास दिला जायचा हे लिहून ठेवलेलं आहे.
"माझ्या मुलीला टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्या तिच्या सासू आणि नवऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. असं झालं तरच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल आणि असं कृत करणाऱ्यांना लगाम लागेल. कठोर शिक्षा झाली तरच भविष्यात अशा घटना घडणार नाही," अशी प्रतिक्रिया जागृतीचे वडील गजानन वराडेंनी दिली.