पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा! पिकनिकसाठी गेलेल्या चिमुकलीचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू

आतापर्यंत लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये पडून तीन बालकांचा मृत्यू झालाय. मात्र तरीही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही

Updated: Nov 28, 2022, 06:31 PM IST
पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा! पिकनिकसाठी गेलेल्या चिमुकलीचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ : डोबिंवलीवरुन (dombivali) लोणावळ्यात पिकनिकसाठी गेलेल्या एका कुटुंबातील दोन वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) बुडून मृत्यू झालाय. मृत मुलीच्या कुटुंबियांनी शनिवारी एक बंगला भाड्याने घेतला होता. कुटुंबिय सकाळी नाश्ता करत असताना ही चिमुकली स्विमिंग पूलजवळ खेळत होती. त्यावेळी पाण्यात पडल्याने या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रविवारी सकाळी 9.15च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यावेळी कोणती सुरक्षा व्यवस्था या बंगल्यावर होती किंवा नाही याचा तपास आता करण्यात येत आहे. याआधीही लोणावळ्यात अशाच प्रकारे एका मुलाचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू झाला होता. आतापर्यंत तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

शेजाऱ्यांनी पाहिलं आणि...

लोणावळयात भाड्याने घेतलेल्या एका बंगल्याच्या स्विमिंग पूलमध्ये पडून 2 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मोहम्मद नदिम कैसर हुसेन सय्यद यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मोहम्मद नदिम सय्यद हे इतर सदस्यांसोबत नाष्टा करत असताना बंगल्याच्या टेरेसवर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये ही दुर्घटना घडली. शेजारील बंगल्यातील नागरिकाना स्विमिंग पूलमध्ये कोणीतरी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी ही बाब मोहम्मद सय्यद यांना सांगितली. सय्यद कुटुंबियांनी तात्काळ जाऊन पाहिले असता त्यांची मुलगी पाण्यात पडलेली दिसली. कुटुंबियांनी तिला पाण्यातून बाहेर काढत लोणावळा येथील संजीवनी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलीला मृत घोषित करण्यात आले.

500 हून अधिक स्विमिंग पूल अनधिकृत 

दरम्यान, लोणावळा शहरात मुंबईमधून अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्यावेळी पर्यटक खासगी बंगले घेऊन राहतात. बंगल्यांमध्ये स्विमिंग पूलदेखील असतात. लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वेक्षनानुसार खासगी बंगल्यामध्ये 997 स्विमिंग पूल बांधण्यात आहेत. त्यातील सुमारे 500 हून अधिक स्विमिंग पूल हे अनधिकृत आहेत. या अनधिकृत असलेल्या स्विमिंग पूलच्या मालकांना नगरपरिषदेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र नोटीस बजावल्यानंतरही नगरपरिषदेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसलयाचे यानिमित्ताने समोर आले आहे.