ड्रग्ज तस्करीतून कमावलेले करोडो रुपये ललित पाटीलने कुठे गुंतवले?; पुणे पोलिसांना भलताच संशय

Lalit Patil Drug Case In Marathi: Lalit Patil Drugs Case: पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ललित पाटीलने पैसा कुठे गुंतवला?

योगेश खरे | Updated: Oct 26, 2023, 09:07 AM IST
ड्रग्ज तस्करीतून कमावलेले करोडो रुपये ललित पाटीलने कुठे गुंतवले?; पुणे पोलिसांना भलताच संशय title=
Drug mafia Lalit Patil invested a large amount of money in gold and plot

Lalit Patil Drug Case: ललित पाटील प्रकरणात दररोज नवीनवीन खुलासे होत आहेत. ललितवर कोटयवधी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे. ड्रग्समधून कमावण्यात आलेल्या कोट्यवधीचा हा पैसा ललित पाटीलने कुठे गुंतवला व त्याची विल्हेवाट कशी लावली, याचा शोध पोलिस घेत होते. याच्या मुळाशी जाण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. ड्रग्स निर्मितीतून येणारा कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट ललित पाटीलने कशी लावली, याबाबत पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. (Lalit Patil Property)

ड्रग्स निर्मितीतून येणारा कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट ललित पाटील यांनी जमिनी खरेदी करून केली असावी असा संशय पुणे पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील इतर भागात ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह त्याचा भाऊ भूषण पाटील, कुटुंब आणि त्याचा मित्र अभिषेक बलकवडे यांच्या नावावर मालमत्तेची नोंद केली आहे की, याची शोधा शोध पोलिसांनी सुरू केली आहे. 

ललित पाटीलची प्रेयसी प्रज्ञा कांबळेच्या नावावर सुद्धा प्रॉपर्टी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे पोलिसांनी याबाबत नोंदणी व मुद्रांक विभागाला याबाबतची सखोल माहिती शोधून काढण्यासाठी पत्र दिले आहे. 

दरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दररोज 15 कोटी रुपयांची कमाई ललित पाटीलला होत होती. यातील काही कमाई त्याने सोन्यामध्ये गुंतवली होती. तर ललितची मैत्रीण अर्चना निकम हिच्याकडे पाच किलो सोने सापडले आहे. ज्या सराफाकडून हे सोने विकत घेतले होते त्या सोनाराला पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. दरम्यान ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळे आणि अरविंद लोहारे या दोघांना पुणे पोलिसांनी 30 पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील देवळा जिल्ह्यातील गिरणा नदीत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. ललित पाटील याच्या सहकाऱ्यानेच हे ड्रग्स लपवून ठेवले होते. ललित पाटिलचा सहकारी सचिन वाघ यानेच गिरणा नदीच्या पाण्यात ड्रग्स लपवले होते. देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीमध्ये कोट्यवधीच्या रुपयांचे ड्रग्स पॅकेट आढळून आले आहेत. पोलिसांनी स्कुबा ड्रायव्हिंग करणाऱ्या स्विमर्सचा वापर करुन आणि विविध सर्च टीमच्या सहाय्याने ड्रग्स नदीच्या पाण्यातून पुन्हा बाहेर काढले आहेत. 

पालघरमधील मोखाडा येथे ड्रग्जचा कारखाना असल्याचे समोर आले होते. याच कारखान्यात ललित पाटील ड्रग्जची निर्मिती करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.