पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाचा जोर सुरु आहे. त्यामुळे विविध भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. पावसानं राज्यात कहर केल्यामुळे शाळांना अनेक जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातही गुरुवारपासून पुढील 3 दिवस शाळा बंद राहणार आहेत. पालिका प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. (due to heavy rain prediction in pune district school are closed next 3 days)
पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये पुढचे 3 दिवस शाळा बंद राहणार आहेत. फक्त इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर आणि शिरूर या तालुक्यांना यामधून वगळण्यात आलेत. म्हणजे तिथे शाळा सुरू राहणार आहेत.
पुण्यात अनुक्रमे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारपर्यंत शाळा बंद राहतील. तर 17 तारखेला रविवार आहे. त्यामुळे बच्चे कंपनीला पावसामुळे सलग 4 दिवस सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
हवामान विभागाकडून शहर आणि परिसरात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्रास होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले,पर्यटन क्षेत्र तसेच धरण परिसर तसेच तलाव परिसरात पुढील तीन दिवस म्हणजेच 14 ते 17 जुलैपर्यंत 144 कलम लावण्यात आलंय.