जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

जालना जिल्ह्यात आतापर्यत ७७ टक्के पेरणी झाली

Updated: Jul 25, 2019, 07:25 PM IST
जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट title=

नितेश महाजन, झी मिडिया, जालना : जालना जिल्ह्यात आतापर्यत ७७ टक्के पेरणी झाली आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने झालेली पेरणी धोक्यात आली आहे. पिके संकटात सापडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

विहिरीच्या पाण्याने गाठलेला तळ, पावसाअभावी पिकांनी टाकलेल्या माना आणि डोक्याला हात लावून आकांशाकडे एकटक बघणारा शेतकरी ही परिस्थिती मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील आहे. गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यात सलग २ आठवडे पाऊस झाला पण, हा पाऊस फक्त दोनच तालुक्यात कोसळला. 

उर्वरीत ६ तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. त्यावर शेतकऱ्यांनी कपाशी, मका, सोयाबीन पिकांची लागवड आणि पेरणी केली. पण आता पावसाने उघडीप दिली, त्यामुळे खरिपाच्या पिकांची दुरावस्था झाली आहे. पिके अक्षरशः करपू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. शेतकऱ्यांनीही कपाशीची लागवड केली. पावसाचा भरवसा नाही म्हणून ठिंबक देखील केले. त्यावर बियाणे, मजुरी, खते असा हजारो रुपयांचा खर्च केला. शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. ठिंबकने पाणी देण्याइतकही विहिरीत पाणी नाही. त्यामुळे कपाशी जमिनीवर माना टाकू लागली. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी करपली म्हणून कपाशीच्या शेतात ट्रॅक्टर टाकून कपाशी उखडून टाकली.

जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या २० टक्के इतका पाऊस झाला. त्यावर जिल्हाभरात  ७७ टक्के पेरणी झाली. पण, पाऊस नसल्याने पिके जगवायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.