गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : राज्यात अनेक जिल्ह्यातक दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई पहायला मिळत आहे. पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अशात आता पाण्यामुळे मुलांची लग्न जुळेनात. हिंगोली जिल्ह्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. पाणी नसल्याने गावातील मुलांचे लग्न होणं ही अवघड बनल आहे.
संघा नाईक तांडा... हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील या गावात भयानक स्थिती पहायला मिळत आहे. 12 महिन्यातील 7 महिने तांड्यावर भीषण पाणीटंचाई असते. वाढत्या तापमानामुळे राज्यात पाणी टंचाईचे संकट घोंघावत आहे, हिंगोली जिल्ह्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट असून या गावातील अनेकांनी आपलं पाणी चोरी होऊ नये म्हणून चक्क पाणी कुलूप बंद करून ठेवल आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांवर पाणी कुलूप बंद करुन ठेवण्याची वेळ आलेय.
पाणीटंचाईच्या झळा मुक्या जनावरांनाही बसताहेत. काहींनी नातेवाईकांकडे जनावरं नेऊन सोडलीत तर काहींनी खाटकाच्या दावणीला बांधली. दरम्यान, कुणी पाणी चोरू नये म्हणून गावातल्या पाण्याच्या टाकीला चक्क टाळं लावण्यात आलंय.. पाण्याअभावी गावच्या मुलांची लग्नही रखडल्याचं ग्रामस्थ सांगताहेत.
प्रशासनानं टँकरनं पाणी देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यासाठी मोठी झुंबड उडते. त्यात टँकरवरून पडून 3 मुलं जखमी झाल्याची घटना घडलीय. वारंवार प्रस्ताव पाठवूनही जलजीवन मिशन योजना मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करताहेत.
कुलूप लावून पाणी सुरक्षित ठेवण्याची वेळ या गावावर आलीय... मायबाप प्रशासन या गावाला नियमित पाणीपुरवठा कधी करणार, याकडं गावक-यांचे डोळे लागलेत.
बीड जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होत चालली आहे. याचा फटका आता फळबागांना बसतोय. त्यामुळे पाण्याअभावी फळबागांना फळचं आली नाहीत तर आता फळबागा वाळून जातायत. त्यामुळे फळबागा काढून टाकण्याची वेळ शेतक-यांवर आलीय. पांडुंरंग डांबे या शेतक-याने आपली दीड एकराची लिंबाची बाग जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकलीय...