एकनाथ खडसे यांची ईडीकडून तब्बल ६.३० तास चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांची ईडीकडून तब्बल ६.३० तास चौकशी (ED inquiry ) झाली.  

Updated: Jan 15, 2021, 06:35 PM IST
एकनाथ खडसे यांची ईडीकडून तब्बल ६.३० तास चौकशी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांची ईडीकडून तब्बल ६.३० तास चौकशी (ED inquiry ) झाली. यापुढेही ईडीने चौकशीसाठी बोलावल्यास आपण हजर राहू असे खडसे यांनी चौकशी संपल्यानंतर स्पष्ट केले आहे. (ED inquiry of Eknath Khadse) खडसे मुंबईतल्या ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजताच दाखल झाले होते. त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांचीही मुलगी शारदा खडसेही त्यांच्यासोबत होती. खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे गेल्यावेळी खडसेंची चौकशी टळली होती. 

दरम्यान, पुण्यात भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले होते. खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आज हजर झाले.

जमीन व्यवहार या वादग्रस्त प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना चौकशीला समोरे जावे लागले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचे प्रकरण आहे. ही जमीन अब्बास उकानी या नावाच्या व्यक्तीकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 3 कोटी 75 लाख रुपये देऊन खरेदी केली. स्टॅम्प ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले. या व्यवहाराची नोंदणी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती 99 वर्षांच्या करारावर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. 

खडसे महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाल्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या पत्नी आणि जावयाने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर खडसेंनी 4 जून 2016 रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आले.