नागपूर : तुमची मुलं स्कूलबसने जात असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे...कारण ही बातमी पाहील्यावर स्कूलबसने जाणारी मुलं सुरक्षित आहेत का? असा विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आठ वर्षीय विद्यार्थ्याने चालकाच्या निष्काळजीमुळे जीव गमावल्याचं समोर आलं आहे.
यश मिश्रा असं या विद्यार्थ्याचं नाव. बजेरिया परिसरात राहणारा हा आठ वर्षीय चिमुरडा सगळ्यांचाच लाडका होता. मात्र शुक्रवारी यशचा अपघाती मृत्यू पाहण्याची दुर्दैवी आणि मन पिळवटून टाकणारी घटना याच परिसरातील लोकांसमोर घडली. ऑरेंज सिटी हायस्कूलच्या तिस-या वर्गाचा विद्यार्थी असलेला यश शुक्रवारी दुपारी सव्वा तीनच्यादरम्यान बजेरिया दौलत पटेल मार्गावरच्या चौकात स्कूल बसमधून उतरत होता. स्कूल बस चालकांचं मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हतं.
निष्काळजी स्कूल बसचालकानं बस पुढे नेली आणि त्याच वेळी यश उतरताना पडला आणि स्कूल बसचं चाक त्याच्या अंगावरून गेलं. धक्कादायक म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केला तेव्हा बसचालकाला या अपघाताविषयी कळलं. या अपघातात यशचा मृत्यू झाला आहे.
ऑरेंज सिटी हायस्कूलच्या स्कूल बसमध्ये अटेंडटही नव्हता. त्यामुळे स्कूल प्रशासनही या घटनेला तितकंच जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र अनेक शाळांमध्ये त्या अद्याप स्थापित नाहीत. तर अनेक ठिकाणी त्या केवळ कागदावरच आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसत आहे.
खरतरं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नियमावली आहे. मात्र शाळा,स्कूल बसचालक त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे तुमचे पाल्य देखील स्कूल बसने शाळेत जात असतील तर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. शाळा आणि बलचालक सर्व नियम पाळत आहेत ना? याकडे पालकांनी थोडं अधिक लक्ष द्यावं.
स्कूल बससाठीची नियमावली
* स्कूल बसमध्ये अटेंडट असणे आवश्यक ..
* केवळ विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा रंग पिवळा असावा.
* खिडकीखाली 150 मि. मि. रुंदीचा तपकिरी पट्टा असावा. पुढे आणि मागे शाळेचं नाव
* वाहनास स्पीड गव्हर्नर बसवणं बंधनकारक
* वाहनात चढताना पहिली पायरी 220 मि.मि. पेक्षा कमी असावी आणि पायरीचा पृष्ठभाग निसरडा असता कामा नये..
* वाहनाच्या पुढच्या दोन्ही बाजूला बहिर्गोल आरसे बसवणं बंधनकारक
* वाहनाला आपत्कालीन दरवाजा नियमानुसार असावा
* खिडक्यांना 3 आडव्या सळ्या बसवणं बंधनकारक
* वाहनात प्रथमोपचार पेटी आणि 5 कि.ग्रॅ 2 अग्निशामक यंत्र बसवावे
* वाहनाच्या पुढे आणि मागे शालेय विद्यार्थ्यांचे चित्र असलेला 350 X 350 चा बोर्ड रंगवून घ्यावा आणि स्कूल बस असे लिहलेले असावे