खडसे-महाजन यांच्यात आता 'नको रे दुरावा?'

भाजप नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर दिसले. 

Updated: Oct 1, 2018, 03:35 PM IST
खडसे-महाजन यांच्यात आता 'नको रे दुरावा?' title=

जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर दिसले. अनेक दिवसानंतर खडसे आणि महाजन एकाच मंचावर दिसून आले. खडसे आणि महाजन यांच्यामध्ये अर्थमंत्री मुनगंटीवार तर जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बसलेले होते.

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर दिसले, तरी त्यांची मनं जुळतील का? एकनाथ खडसे यांच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असणारी नाराजीची धग शांत होईल का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि महाजन यांच्यातला दुरावा चर्चेत आहेत. एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर हा दुरावा अधिक चर्चेत होता. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी मोठ्या प्रमाणात, अंतर्गत गटबाजी दिसून आली आहे.

मात्र निवडणुकाजवळ आल्यानंतर पुन्हा खडसे-महाजन यांच्यातील दुरावा कमी करण्याचं काम पक्षाकडून केलं जातंय की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान यापूर्वी वेळोवेळी एकनाथ खडसे यांनी पक्षनिष्ठा आणि त्याबाबत मिळत असलेली वागणूक याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.