इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची विरारमध्ये राजकीय एन्ट्री

प्रदीप शर्मा यांचा राजकीय प्रवास सुरु 

Updated: Sep 15, 2019, 08:05 PM IST
इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची विरारमध्ये राजकीय एन्ट्री title=

विरार : नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे संभाव्य उमेदवार इन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी वसई विरार क्षेत्रात अखेर आज शिवसेनेच्या झेंड्याखाली जाहीर एन्ट्री केली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यातून त्यांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पहिली भेट त्यांनी चंदनसार येथील आगरी सेनेच्या कार्यालयाला दिली. त्यानंतर वसईतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधण्यासाठी वाट धरली.

प्रदीप शर्मा यांचा शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपास्थितीत जाहीर प्रवेश झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी वसई विरार शहरात स्टेशन परिसर, रहदारीच्या अनेक ठिकाणी 'चोर की पोलीस? ' असे भगवे बॅनर लावण्यात आल्याने वसईत या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे याबाबत प्रदीप शर्माना विचारले असता त्यांनी यावर अधीक भाष्य न करता ' मी पोलीस आहे' असे फक्त सांगितले. त्यामुळे बॅनरबाजीतला नेमका चोर कोण? यावर अजूनही प्रशचिन्ह आहे.

प्रदिप शर्मांच्या अशा राजकीय एन्ट्रीमुळे वसई विरार शहरातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. शर्मांच्या नालासोपाऱ्यातील राजकीय एन्ट्रीमुळे येथे बदल होईल असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून वसई विरार शहरावर एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीचा गढ महायुतीचे सरकार जिंकू शकेल का हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.