चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक : शेतीसाठी शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. पिकाचं किडी आणि रोगांपासून संरक्षण करायचं तर फवारणी गरजेची असते. त्यात फवारणीमुळे शेतकरी दगावल्याचंही आपण पाहीलं. हीच रासायनिक औषधांची फवारणी चांगल्यापद्धतीनं झाली तर उत्पन्न चांगलं येतं. यासाठी चांदवडमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी फवारणी करणारं ड्रोन विकसित केलंय.
चांदवडच्या एसएनजेबी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन फवारणीसाठी ड्रोन विकसित केलंय. या फवारणी करणाऱ्या ड्रोनद्वारे झाडांवर फवारणी करताना पोहचू शकत नाही तेथेही फवारणी होऊ शकते. विशेष म्हणजे या ड्रोनद्वारे रासायनिक औषधी फवारणी करताना शेतकरी विषारी फवाऱ्यापासून दूर राहत असल्यानं विषबाधेचा प्रकारही टाळता येणार आहे.
शेतीतील फवारणीसाठी ड्रोनचा वापर परदेशामध्ये ठराविक ठिकाणी केला जातो. मात्र, हे तंत्रज्ञान महागडे आहे. सध्या चांदवडच्या विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर तयार केलेला ड्रोन हा एक लिटर क्षमतेचा आहे. लवकरच आठ ते दहा लिटर क्षमतेचा ड्रोन बनवणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगीतलं.
हा ड्रोन शेतक-यांपर्यंत एक ते दिड लाख रुपयांपर्यंत जाईल. या ड्रोनद्वारे फवारणी करताना पिकाच्या रचनेनुसार फवारणी नोझल अॅडजस्ट करता येतो. तर फवारणीसाठी असलेले औषध कमी झालं तरी त्याची माहिती शेतकऱ्याला आपोआप मिळते. अवघ्या २० मिनिटांमध्ये एक एकर फवारणी करण्याची क्षमता नव्या ड्रोनमध्ये असणार असल्यानं शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे.
नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन