अहमदनगर : नगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये गोळीबारात मृत्यू पावलेल्या संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघा शिवसेना पदाधिका-यांचे मृतदेह अहमदनगरमध्ये आणण्यात आलेत. थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र पुणे-नगर रोडवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढली. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांना अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केलीय. तत्पूर्वी दोन्ही मृतदेहांचं शवविच्छेदन औरंगाबादमध्ये करण्यात आलं. मात्र या दोघांचे मृतदेह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली होती. यामुळे जिल्ह्यातली तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र अधिक परिस्थिती चिघळू न देता शिवसेनेच्या नेत्यांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
अहमदनगर केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर, शिवसेना आपल्या मागणीवर आक्रमक झाली आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सर्व मुख्य आरोपींना अटक केल्याशिवाय, अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ही माहिती दिली आहे.