लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान

नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.  

Updated: Oct 14, 2020, 01:35 PM IST
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान   title=

शशिकांत पाटील / लातूर : नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे. जवळपास ८६० मिमी इतका पाऊस जिल्ह्यात झालाय. लातूर जिल्ह्यातील काल रात्री पासून बरसत असलेल्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ही ६८ मिमी इतकी आहे. तर सर्वाधिक पाऊस हा निलंगा तालुक्यात ११० मिमी इतका झाला आहे. 

देवणी तालुक्यात ९० मिमी, औसा तालुक्यात ८१ मिमी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ८० मिमी, चाकूर तालुक्यात ६५ मिमी इतक्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथून वाहणाऱ्या तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी शेतात काढुन ठेवलेली सोयाबीनची बनिम वाहून गेली. याचे चित्रण ग्रामस्थांनी मोबाईल मध्ये चित्रित केलं. बोरसुरी येथील चार तर चांदोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनिम या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील पाण्याचं तळं पुर्णपणे भरुन तळ्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होतं. रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे नेलवाड ते कासारशिरसी जाणारा रस्ता झाला बंद होता. निलंगा तालुक्यातील वाहणाऱ्या मांजरा आणि तेरणा नदी भरभरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिलाय. याशिवाय जिल्ह्यातील इतरही नदी, नाले ओढे भरभरून वाहू लागले आहेत. एकूणच दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात आता अति पावसामुळे ओला दुष्काळ पडल्याचे दिसून येत असून बळीराजाला सरकारने भरीव मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे.