Loksabha Election : बारामतीचा हायव्होल्टेज सामना! काका की पुतण्या? राष्ट्रवादीची खरी लिटमस टेस्ट

Baramati Lok Sabha Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचंच लक्ष लागलंय ते बारामतीकडं... राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं बारामतीकर जनता आता नेमकी कोणत्या पवारांच्या मागे उभे राहणार?

Updated: Mar 26, 2024, 09:20 PM IST
Loksabha Election : बारामतीचा हायव्होल्टेज सामना! काका की पुतण्या? राष्ट्रवादीची खरी लिटमस टेस्ट title=
Winning Scenario For Supriya Sule vs Sunetra Pawar in Lok Sabha Election 202

Lok Sabha Election 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar : बारामती... एकेकाळचं भीमथडी... कऱ्हा नदीच्या काठी वसलेला ऐतिहासिक महत्त्व असलेला तालुका... कधीकाळी बारामतीवर देवगिरीचे यादव राज्य करत होते. आता बारामती ओळखली जाते ती शरद पवारांची कर्मभूमी म्हणून... काटेगाव हे पवारांचं जन्मगाव... गेल्या सहा दशकांपासून बारामती म्हणजे शरद पवार असं राजकीय समीकरण बनलंय. देशाच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर बारामती फेमस झाली ती पवारांनी घडवून आणलेल्या सर्वांगीण विकासामुळं... मात्र ही प्रगती टिकवण्याचं आव्हान आता उभं राहिलंय.

बारामतीत कधी वाढणार विकासाची गती?

बारामतीमधील 42 गावं अजूनही पाण्यासाठी तहानलेली आहेत, हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. इंदापूरमधल्या 22 गावांमध्येही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. नीरा आणि भीमा नदीमध्ये कारखान्यांमधलं दूषित पाणी सोडलं जात असल्यानं प्रदूषण मोठी समस्या बनलीय. पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली... मात्र विमानतळ कागदावरच राहिला. इंदापुरात पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिली. मात्र नामांकित कारखाने नसल्यानं फारच कमी रोजगारनिर्मिती झाली. लाकडी लिंबोडी उपसा प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. भोर तालुक्यातील आदिवासी समाज दैनंदिन सुविधांपासून वंचित आहे. पुण्यालगतच्या खडकवासला भागात ट्रॅफिक जॅम आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय.

पवारांचं होम ग्राऊंड असलेलं बारामती... १९९६ पासून लागोपाठ चार टर्म शरद पवार, तर २००९ पासून लागोपाठ तीन टर्म सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. 2009 मध्ये सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांता नलावडेंचा सव्वा तीन लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी काँटे की टक्कर दिली. तरीही सुप्रिया सुळे ६९ हजार मतांनी विजयी झाल्या. 2019 मध्ये त्यांनी विजयाची हॅटट्रिक करताना भाजपच्या कांचन कुल यांना दीड लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 आणि भाजपचे 2 आमदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी उभी फूट पडल्यानं आता बारामतीच्या होम ग्राऊंडवर राजकीय महाभारत सुरू झालंय. भाजपच्या पाठिंब्याचं टायमिंग साधत अजित पवारांनी आपल्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवारांना रणमैदानात उतरवण्याची अचूक वेळ निवडलीय. तर बारामतीचा गड राखण्यासाठी सुप्रिया सुळेंनी संघर्षाची तुतारी फुंकलीय.

बारामती खरी लिटमस टेस्ट 

बारामतीच्या या राजकीय महाभारतात इतर पात्रांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. विजय शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात उघड तोफ डागलीय. हर्षवर्धन पाटील, राहुल कुल हे भाजप नेते महायुतीत असले तरी अजित पवारांमुळं दुखावले गेलेत.भोरच्या अनंतराव आणि संग्रामसिंह थोपटेंचं तर पवारांशी हाडवैर आहे. ऐन लढाईच्या वेळी हे सगळे काय भूमिका घेतात, यावर बारामतीचं जय-पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे. दरम्यान, ऐनवेळी बारामतीचा महायुतीचा उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा अजित पवार अशी नणंद विरुद्ध भावजय घनघोर लढाई होईल, असंच सध्याचं चित्र आहे. यानिमित्तानं पवार कुटुंबातही उभी राजकीय फूट पडल्याचं चित्र दिसतंय. खुद्द अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या कुटुंबानं शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतलीय. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी उमेदवार असल्या तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे.आणि या लढाईत यंदा बारामतीकर मतदार पुरता धर्मसंकटात सापडलाय. काका की पुतण्या, यापैकी एकाची निवड करताना बारामतीकरांचा चांगलाच कसं लागणार आहे.