Loksabha Election : वंचित मविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकरांसमोर आघाडीचा नवा प्रस्ताव

Maharastra Politics : प्रकाश आंबेडकरांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर मग मविआमध्ये धावाधाव सुरु झाली. आता मविआनं प्रकाश आंबेडकरांसमोर चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव ठेवलाय.

सौरभ तळेकर | Updated: Mar 26, 2024, 08:56 PM IST
Loksabha Election : वंचित मविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकरांसमोर आघाडीचा नवा प्रस्ताव title=
Maharastra Politics Vanchit lokSabha With MVA

Vanchit lokSabha With MVA : शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला हाताशी धरत महाविकास आघाडीची मोट बांधली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्त्ववादी राजकारणाला आव्हान देणारी ही आघाडी.. तरीही या आघाडीत अजूनही वंचितचा (Vanchit bahujan Aghadi) समावेश झालेला नाही. राज्यातल्या दलित आणि बहुजनांचं वर्चस्व असलेल्या अनेक मतदारसंघांवर वंचितचा प्रभाव आहे. तेव्हा वंचितच्या पाठिंब्याशिवाय भाजपप्रणित महायुतीविरोधातला लढा मविआला आव्हानात्मक ठरू शकतो. प्रकाश आंबेडकरांना मविआकडून चार जागांचा देण्यात आलेला प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांना मान्य नाही. वंचितने मविआला  (MVA) दिलेल्या अल्टिमेटमची दखल न घेतल्याने प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मविआला निर्वाणीचा इशारा दिलाय.

आंबेडकरांच्या निर्वाणीच्या इशा-यानंतर मग मविआमध्ये धावाधाव सुरु झाली. आता मविआनं प्रकाश आंबेडकरांसमोर चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव ठेवलाय. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं आगामी लोकसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत.  2019 मध्ये वंचितने एमआयएमसोबत युती करत लोकसभेच्या 47 जागा लढवल्या होत्या. 

2019 लोकसभा निवडणुकीत वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 7 ते 8 ठिकाणी वंचितचा फटका बसला होता. सोलापुरात काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंचा 1 लाख 58 हजार 608 मतांनी पराभव झाला होता. तर त्याचवेळी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना एक लाख 70 हजार मते मिळाली होती. 2019 च्या विधानसभेत वंचितने 288 जागांपैकी 234 जागा लढवल्या. वंचितला 10 जागांवर दुस-या क्रमांकाची मते पडली होती. तर अनेक मतदारसंघांमध्ये वंचितने तिस-या क्रमांकाची मते मिळवली होती.

वंचित स्वतंत्र लढल्यामुळे लोकसभेला 7 ते 8 आणि विधानसभेला 10 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता. याचा मोठा फायदा भाजपला झाला होता. मविआसोबत काडीमोड झाल्यास प्रकाश शेंडगेंचा ओबीसी मोर्चा, मनोज जरांगे यांना मानणारा गट आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन आंबेडकर तिस-या आघाडीची देखील घोषणा करण्याची शक्यता होती. तसं झाल्यास मतविभागणी होऊन भाजपप्रणित महायुतीलाच त्याचा मोठा फायदा होणार आहे. तेव्हा मविआच्या नव्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.