कोरोना लॉकडाऊनमधील अनोखा लग्नसोहळा

कोल्हापुरातील लॉकडाऊन लग्नाची अनोखी गोष्ट

Updated: Apr 16, 2020, 06:35 PM IST
कोरोना लॉकडाऊनमधील अनोखा लग्नसोहळा title=

प्रताप नाईक, कोल्हापूर : कोरोनामुळे सगळं ठप्प झालं आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभ रद्द झाले आहेत. साखरपुडा, हळद, लग्नसोहळा सगळं नियोजनच कोलमडलं आहे. पण या परिस्थितीवर मात करून कोल्हापुरात एक लग्न पार पडलं. तेही सरकारच्या कुठल्याही आदेशाचं उल्लंघन न करता. वाचा लॉकडाऊनमध्ये पार पडलेल्या एका लग्नाची अनोखी गोष्ट.

एका अनोख्या लग्नाची गोष्ट आहे कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातली. सीआरपीएफमध्ये काम करणारे अर्जुनवाडीचे सुपुत्र अभिजीत दोरगुडे लग्नासाठी गावात दाखल झाले होते. कुदनुर गावची सुकन्या रुपाली निर्मळकर हिच्याशी त्यांचा विवाह निश्चित झाला होता. पण लॉकडाऊनची घोषणा झाली आणि धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी केलेली सगळी तयारी वाया गेली. पण दोन्ही कुटुंबांनी यातून अनोखा मार्ग काढला.

लग्नाला यायचं नाही हं!

सोशल मीडियातून सर्वांना लग्नपत्रिका पाठवली गेली. ती देखील लग्नाला न येण्यासाठीची.... पण लग्नाला न येता लग्न सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती मात्र पत्रिकेत होती. लग्नसोहळा फेसबुकवर लाईव्ह असेल. जिथे असाल तिथूनच या सोहळयात सामिल व्हा आणि तिथूनच अक्षता टाकून आशीर्वाद द्या.... तुम्ही घरातून बाहेर न पडता कोविडविरोधात सरकारला मदत करणं हेच आमच्यावरचं प्रेम समजू, असा ह्रदयस्पर्शी संदेश दोरगुडे आणि निर्मळकर कुटुंबीयांनी दिला होता.

मदतनिधीत देणगी हाच आमचा अहेर!

विशेष म्हणजे लग्नासाठीच्या निमंत्रणात दोन्ही कुटुंबीयांनी अहेराची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी दोन बँक खात्यांचा तपशीलही दिला. अर्थात ही बँक खाती दोन्ही परिवारांची नव्हती. तर एक होतं पीएम केअर्स फंडाचं आणि दुसरं मुख्यमंत्री सहाय्यता (कोविड-१९) निधीचं. या खात्यावर निधी जमा करा. त्याची आम्हाला आलेली पोचपावती हाच आमचा अहेर, असा सामाजिक भान देणारा संदेश पत्रिकेत होता.

विशेष म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळींनीही हे निमंत्रण स्वीकारलं. १५ एप्रिलला लग्न लागलं तेव्हा फेसबुकवरूनच अक्षता टाकल्या, शुभाशीर्वाद दिले. अगदी साध्या पद्धतीने घरीच हा सोहळा पार पडला. जे मोजके कुटुंबीय होते त्यांनी सोशल डिस्टसिंगचा नियम पाळला. वधु-वरांसह सर्वांनी मास्कही वापरले. सैनिकाचे लग्न म्हटल्यावर त्यात शिस्तही आलीच. नियमाचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन हा अनोखा लग्नसोहळा पार पडला.

 

कोल्हापूरकरांना वाजतगाजत, धुमधडाक्यात होणारा विवाह काही नवीन नाही. पण लॉकडाऊनच्या काळात सरकारचा आदेश पाळून आणि सामाजिक भान जपून केलेल्या या अनोख्या आणि अविस्मरणीय विवाहसोहळ्याची चर्चा आणि कौतुक होत आहे.