रत्नागिरी : कोकणात डायनासोर आलेयत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, एक व्हीडिओ व्हायरल करून कोकणात डायनासोर आल्याचा दावा करण्यात आलाय. व्हीडिओतील प्राणी डायनासोरच असल्याचं सांगितल्याने आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली चला पाहुयात. (fact check viral pokhol Konkan beach dinosaurs)
दावा आहे की कोकणात डायनासोर आलेयत. शेकडो वर्षांपूर्वीच लुप्त झालेले डायनासोर पुन्हा कसे काय आले, याच भीतीनं सगळेच हादरून गेले आहेत. व्हिडिओत एका मागोमाग एक असे एक दोन नव्हे तर डायनासोरसारखे दिसणारे तब्बल 18 प्राणी समुद्र किनाऱ्यावरून धावताना दिसत आहेत.
हुबेहुब डायनासोरसारखी मान, चालही तशीच. त्यामुळे दहशत निर्माण झालीय. पण, खरंच कोकणात समुद्र किनारी डायनासोर फिरतायत का? जगात पुन्हा डायनासोरचा उदय झालाय का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं पडताळणी सुरू केली.
आमचे प्रतिनिधी प्रवण पोळेकर रत्नागिरीच्या समुद्र किनारी पोहोचले. तिथे लोकांना या व्हिडिओतील प्राण्यांबाबत विचारलं.
कोकणातील समुद्र किनाऱ्यावर डायनासोर आल्याचा दावा केल्यानं आम्ही समु्द्र किनाऱ्यावर येऊन पाहणी केली. पण, इथे डायनासोर आल्याची माहिती कुणालाही नाही, तसंच व्हिडिओ दाखवला असता, ही दृष्य कोकणातील नसल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं.
डायनासोर सारखे दिसणारे प्राणी कोकणात आले नसल्याचं स्पष्ट झालं. पण, हे प्राणी आहेत तरी कुठे, हे खरंच डायनासोर आहेत का, याची आम्ही पडताळणी केली. मग आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.
व्हीडिओत दिसत असलेले डायनासोर नाहीत. कोटी नावाचा हा प्राणी असून, अमेरिकेत आढळतो. व्हीडिओ रिव्हर्स करून डायनासोर असल्याचं दाखवलं. त्यामुळे कोटी प्राण्याची शेपटी डायनासोरच्या मानेसारखी दिसतेय. कोकणात डायनासोर आल्याची निव्वळ अफवा असल्याचं सिद्ध झालं.
व्हीडिओ रिव्हर्स म्हणजे उलटा केल्यानं हा कोटी प्राणी डायनासोर असल्यासारखा दिसतोय. पण, कोकणात डायनासोर आलेला नाहीये. मुळात जगातच डायनासोर नाहीयेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत कोकणात डायनासोर आल्याचा दावा असत्य ठरला.