जयेश जगड, झी मीडिया, अकोला : मान्सूनला सुरुवात होणार असल्यामुळे शेत कामांना वेग आला आहे. मात्र सध्या खरीप हंगामात बनावट रासायनिक खतांचा सुळसुळाट बाजारात सुरु झाला आहे. एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
खत उत्पादनाचा तुडवडा असताना अकोल्यातील एम.आय.डी.सी क्रमांक 4 येथे बनावट खत बनवून बाजारात विक्री करुन शेतक-यांची आणि शासनाची फसवणुकीचा धंदा सर्रास सुरु होता. MIDCमधील एका गोडाऊनमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कारवाईदरम्यान काय काय सापडलं?
पोलिसांना गोडाऊनमधून नामवंत खतांच्या कंपनीच्या बनावट खतांचे पॅकिंग आढळले. खताचे पॅकिंगसाठी नामवंत कंपनीचे नवीन प्लास्टिक बारदाना जप्त करण्यात आले.
तर पॅकिंग मशीन, बनावट रासायनिक खतांचा माल, किटकनाशक बॉटल, बनावट हायब्रीड सुमो ग्रानुल्स्, सोडीयम सल्फेटचा कच्चा माल, खत बनविण्यासाठी वापरात येणारे मिक्सर मशीन, निम सीड्स कर्नल ऑईल असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.