पुणतांब्यातील उपोषणकर्त्या मुलींची उध्दव ठाकरेंशी चर्चा

पुणतांब्यातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मुलींनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  फोनवरुन चर्चा केली.  

Updated: Feb 8, 2019, 07:26 PM IST
पुणतांब्यातील उपोषणकर्त्या मुलींची उध्दव ठाकरेंशी चर्चा title=

अहमदनगर : पुणतांब्यातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मुलींनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  फोनवरुन चर्चा केली. अन्नत्याग करणाऱ्या या मुलींची शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंशी चर्चा घडवून आणली. या मुलींच्या आंदोलनाविषयी आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार ठाकरेंच्या सांगण्यावरुन कूषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर पुणतांब्याकडे येण्यासाठी निघाल्याची माहिती खासदार लोखंडेंनी दिली.अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबामध्ये गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकरी कन्यांची दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे या मुलींचे हे आंदोलन सुरुच राहणार आहे. 

महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असतानाच गावातील शेतकरी चळवळीचे बाळकडू मिळालेल्या पुणतांबेमधल्या शेतकऱ्यांच्या तीन मुलींनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ऐन विशीतल्या शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव आणि पूनम राजेंद्र जाधव अशी या आंदोलक मुलींची नावे आहेत. यापैकी शुभांगी आणि पूनम बीएसस्सीचं शिक्षण घेत आहेत, तर निकिता कायद्याचे शिक्षण घेत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्या हे आंदोलन करत आहेत.

पुणतांबा अन्नत्याग आंदोलन : रुग्णालयातही मुलींनी अन्न नाकारलं

मात्र अशक्तपणामुळे यापैकी शुभांगी जाधव हिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं तिनं अन्न नाकारत केवळ सलाईन घेऊन परत पुणतांब्यात येणार असल्याचा निर्धार केला. तर इतर दोघी आंदोलनस्थळीच आंदोलन करत आहेत. दरम्यान पालकमंत्री राम शिंदेंची या मुलींशी चर्चा अयशस्वी ठरली आहे. या तिन्ही मुली आपल्या मागण्यांवर ठाम आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करा, अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीत उपोषण सुरू असतानाच या तिघीही उपोषणाला बसल्या होत्या. स्थानिक पातळीवर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. मात्र प्रशासन तसेच सरकार अजूनही त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.