लातूर: सरणावर चढून संपातील शेतकऱ्याचे आंदोलन

 रेणापूर तालुक्यातील संपूर्ण खलंग्री गावाने शेतकऱ्यांच्या या संपाला ग्रामसभा घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी गावातील बहुतांश शेतकरी उपस्थित होते. 

Updated: Jun 2, 2018, 01:32 PM IST
लातूर: सरणावर चढून संपातील शेतकऱ्याचे आंदोलन title=

लातूर: शेतकरी पुन्हा एकदा संपावर गेला असून, राज्याच्या विविध भागातून शेतकरी या संपाला पाठिंबा देत आहेत. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील तरुण शेतकरी गजानन बोळंगे याने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनोखे आंदोलन केलं. रेणापुर तालुक्यातील पिंपळफाटा इथं लाकडाची चिता तयार करून सरणावर चढून गजानन बोळंगे या शेतकऱ्याने शेतीमालाला हमीभाव द्यावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामातील शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा करावे यासारख्या मागण्या केल्या. यावेळी आक्रमक झालेल्या गजानन बोळंगे याने हातातील पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या रेणापूर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधी घोषणाही उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या. रेणापूर तालुक्यातील संपूर्ण खलंग्री गावाने शेतकऱ्यांच्या या संपाला ग्रामसभा घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी गावातील बहुतांश शेतकरी उपस्थित होते. 

देशभरात शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यानं नवी मुंबईतील बाजारपेठेमधल्या भाजीपाल्यावर याचा परिणाम होण्याची चिन्ह आहेत. आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५१० गाड्या दाखल झाल्या आहेत. नवी मुंबई भाजी बाजारपेठेत नाशिक आणि पुण्यातून भाजीपाला येत असतो. तसंच परराज्यातूनही भाजीपाला इथं आणला जातो. आज पुरेसा भाजीपाला आल्याने भाज्यांचे भाव  स्थिर आहेत. शिमला, मटार या भाज्यांचे भाव वगळता सर्व भाज्यांचे भाव स्थिर आहेत. 
  
दरम्यान, राष्ट्रीय किसान महासंघाने केलेल्या शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचा परिणाम शहरी विभागात जाणवू लागला आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केट मध्ये आज नेहमी पेक्षा भाजीपालाच्या गाड्या कमी दाखल झाल्या आहेत. याचा परिणाम म्हणून आज या मार्केट मध्ये भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे दहा दिवस हा संप कायम राहिलातर भाजी पाल्याचे दर गगनाला भिडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.