जालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

Updated: Sep 23, 2020, 05:25 PM IST
जालना, अकोला येथे  केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन title=

जालना : कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील बंगल्यासमोर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केलं.आंदोलना दरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घराच्या पायरीवर 'कांदा निर्यातबंदी हटवा'अशी ओळ कांद्याने लिहिली. त्यानंतर कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यानंतर बंगल्यावर दाखल झालेल्या दानवे यांच्या स्वीय सहायकाला आंदोलक कार्यकर्त्यांनी मागण्यांचं निवेदन दिलं. मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन करू असा ईशारा देखील आंदोलकांनी दिला.

दरम्यान देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ अकोल्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरा समोर राख रांगोळी आंदोलन करण्यात आलं. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडवे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

या वेळी संजय धोत्रे यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलकांनी यावेळी संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप यांना मागणीच एक निवेदन दिलं सोबतच पियुष गोयल यांच्यासाठी कांद्याची राख दिली. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.