भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फुले रस्त्यावर फेकली

ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फुलं  रस्त्यावरच फेकून दिलीत. 

Updated: Oct 25, 2019, 10:03 PM IST
भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फुले रस्त्यावर फेकली title=
संग्रहित छाया

ठाणे : राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून यामुळे फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला. ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फुलं अक्षरशः रस्त्यावरच फेकून दिली आहेत. त्यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये रस्त्यांवर फुलांचा खच पडलेला दिसून येत आहे. चांगले पैसे मिळत नाही त्यामुळे मुलांची दिवाळी कशी होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

झाडांवरच ओली झालेली फुले बाजारात येईपर्यंत खराब होत आहेत. त्यामुळे या फुलांना पाच रुपये किलोच्यावर दर मिळत नसून यामुळे शेतकरी पुरते हवालदील झालेत. ही फुले नाशिकहून कल्याणला आणण्यासाठीच एका किलोमागे सात रुपयांचा खर्च असून त्याच्यावर आम्हाला दोन तीन रुपयेही मिळणार नसतील, तर आमच्या मुलांची दिवाळी कशी साजरी होणार, असा उद्विग्न सवाल हे शेतकरी विचारत आहेत.

भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली फुले रस्त्यावर टाकून देत परतीची वाट धरली आहे. तर अनेक शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने फुलांची विक्री करत आहेत. मात्र या सगळ्यातही अनेक जण ही फेकून दिलेली फुलंही जमा करून विकण्यासाठी नेताना पाहायला मिळत आहेत. सरकारने आम्हाला अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.