धक्कादायक! यूट्यूब बघून चिमुरडीवर घरीच उपचार, बापाचा अतिशहाणपणा चिमुकलीच्या जीवावर

बापाच्या केवळ हट्टापोटी आणि अतिशहाणपणामुळे खेळण्या-बागडण्याआधीच चिमुकलीला जगाचा निरोप घ्यावा लागला

Updated: Oct 25, 2021, 06:56 PM IST
धक्कादायक! यूट्यूब बघून चिमुरडीवर घरीच उपचार, बापाचा अतिशहाणपणा चिमुकलीच्या जीवावर
प्रातिनिधिक फोटो

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : एक ह्दयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. यूट्यूब-गुगल बघून 14 महिन्यांच्या चिमुरडीवर घरीच उपचार करणं चिमुकलीच्या जीवावर बेतलं आहे. मुलीच्या बापाने घरीच सलाईन आणि इंजेक्शन दिल्यामुळे 14 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला. याप्रकरणी निष्काळजी बापाला अटक करण्यात आली आहे. 

यूट्यूब पाहून उपचार

औषध कंपनीत काम करणाऱ्या हेमंत शेटे या व्यक्तीने आजारी असलेल्या आपल्या मुलीवर यूट्यूब सर्च करत इंजेक्शन देऊन उपचार केले. हेमंत शेटेच्या आई आणि पत्नीने याला विरोध केला. पण आपण औषध कंपनीत कामाला असल्याने काय उपचार करायचेत ते मला माहित अस म्हणत त्याने आई आणि पत्नीचं बोलणं उडवून लावलं. इतकंच नाही तर त्यांना मारहाण करत त्याने आपल्या मुलीला इंजेक्शन दिलं. पण याचा उलट परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे त्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला.

निर्दयी बापाविरोधात तक्रार

याप्रकरणी मुलीच्या आईने पती हेमंत शेटेविरोधात पोलिसात तक्रार केली असून हेमंत शेटेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने हेमंतला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. बापाच्या केवळ हट्टापोटी आणि अतिशहाणपणामुळे खेळण्या-बागडण्याआधीच अवघ्या 14 महिन्यांच्या मुलीला जगाचा निरोप घ्यावा लागला.