रत्नागिरी : रत्नागिरीत मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पाच दिवसांनंतर म्हणजे 1 जूनला मासेमारी बंदी लागू होणार आहे. 90 टक्के मच्छीमारी नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून शाकारून किंवा बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. 1 जूनला मासेमारी बंदी लागू होणार आहे. कोकणाचे मासेमारी हे मुख्य उत्पादन असल्याने दर्जेदार मासे खाण्यामध्ये कोकणी माणूस माहीर आहे. परंतु मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून वातावरणातील बिघाड, सोसाट्याचा वारा, परराज्यातील मच्छीमारांची बेकायदेशीर होणारी घुसखोरी, एलईडी मासेमारी, पारपंरिक आणि पर्ससीननेट मासेमारीतील वाद आदी कारणामुळे मच्छीमारांना हंगामाचा पुरेसा फायदा उठविता आला नसल्याचे सांगण्यात येते.
ट्रीगर फिशच्या आक्रमणाने दर्जेदार मासळी खोल समुद्रात गेल्याने मासेमारीवर मोठा परिणाम झाला. डिझेल, खलाशांचा खर्च, मेहनत आदीचा खर्चच निघेना, एवढी गंभीर परिस्थिती असल्याचे मच्छीमाराचे मत आहे.आतातर मासेमारी बंदी लागू होणार आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार 1 जून ते 31 जुलै 2019 या 61 दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंद घातली आहे. बंदी आदेश मोडल्यास नौक, मासळी जप्त करण्यापासून कठोर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य खात्याने दिला आहे. पाच दिवस शिल्लक असल्याने 90 टक्के मच्छीमारांनी नौका बाहेर काढून शाकारल्या आहेत. काही मच्छीमारांनी मिरकरवाडा, हर्णै आदी बंदरात नौका नांगरून ठेवल्या आहेत.
'जेमतेम पाच दिवस हंगाम राहिला आहे. नव्वद टक्के मच्छीमारांनी नौका बाहेर काढून शाकारून ठेवल्या आहेत. मासळीची आवक कमी झाल्याने सुरमई, पापलेट, बांगड्याचा दर वधारला आहे',असे रत्नागिरीचे मच्छिमार इब्राहिम होडेकर सांगतात.