राजगुरुनगर परिसरात कोरोनाचे पाच, बारामतीत बारावा पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे  जिल्ह्याच्या राजगुरुनगर परिसरात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  

Updated: May 19, 2020, 11:45 AM IST
राजगुरुनगर परिसरात कोरोनाचे पाच, बारामतीत बारावा पॉझिटिव्ह रुग्ण title=
संग्रहित छाया

पुणे : जिल्ह्याच्या राजगुरुनगर परिसरात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तरीही नागरिक खुलेआम घराबाहेर वावरताना दिसून येत आहेत. तर बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या बारावर पोहोचली आहे. तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात हा रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

 राजगुरुनगर परिसरात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र सध्या राजगुरूनगर परिसरात पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे अनेक ठिकाणी उल्लंघन होताना दिसून येत आहे. पोलीस सुरक्षा कायम असली तरी काही जण घराबाहेर पडून बेजबाबदारपणे फिरतानाचे चित्र सध्या या परिसरात पाहायला मिळत आहे.

राक्षेवाडीतील दोन वार्ड कंटेन्मेंट झोन तयार करुन सीमा सिल करण्यात आल्या आहेत. तर राजगुरुनगर शहर बफर झोन करण्यात आले आहे. त्यामुळे राजगुरुनगर शहर आणि परिसरात नागरिकांचा रस्त्यावरील वावर वाढला तर कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे राजगुरूनगर परिसरातील नागरिकांनी आता तरी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन विनाकारण घराबाहेर पडने टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

बारामतीत मालाडहून आला पॉझिटिव्ह रुग्ण

बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या बारावर पोहोचली आहे. तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात हा रुग्ण आढळला आहे. तो मालाडवरुन गावी आला होता. आपल्या मुलीला भेटावयास आलेली व्यक्ती ही कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. एक दिवस या रुग्णाने बारामतीतील वडगाव निंबाळकर या गावात मुक्काम केल्याचीही माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खोमणे यांनी दिली. आतापर्यंत बारामती तालुक्यात सहा रुग्ण बरे झालेत , आता चौघांवर उपचार सुरु आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.