Floor Test : राज्यपालांना एवढी कशाची घाई झालेय? -नाना पटोले

Maharashtra Political Crisis : आम्ही आज सुध्दा फ्लोअर टेस्टला तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Updated: Jun 29, 2022, 03:50 PM IST
Floor Test : राज्यपालांना एवढी कशाची घाई झालेय? -नाना पटोले title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : आम्ही आज सुध्दा फ्लोअर टेस्टला तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेत आहेत. विधानसभा कुस्तीचा आखाडा नाही. अजून 16 आमदारांबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांना एवढी कशाची घाई झालीय? केंद्र सरकारच्या दबावामुळं हे सुरु आहे. एवढी तत्परता विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, 12 आमदारांच्या नियुक्तीत का नाही दाखवली, असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणली. शिंदे गटात 50 आमदार आहेत. शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढल्याचे सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. त्यानंतर भाजपनेही राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करत राज्यपालांना पत्र दिले. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 48 तासांचा अवधी दिलाय. मात्र, 16 आमदारांचा अपात्रेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने 11 जुलैपर्यंत जैसे थी परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र, राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्यास सांगितल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, शिवसेनेत कुणाचा व्हिप चालणार, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजप सरकार पाडण्यासाठी मैदानात उतरले आहे. त्यासाठी देवेंद्र फडवणीस हे काम करत आहेत. संविधानिक व्यवस्थेचा खून करण्याचा आधिकर राज्यपालांना कुणी दिला. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत एक भूमिका आणि आता दुसरी भूमिका हा दुटप्पी पणा आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. संविधानिक व्यवस्था वाचवण्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत. आम्ही आमच्या सर्व आमदारांना बोलवले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

 आम्ही आज सुध्दा फ्लोअर टेस्टला तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. राज्यपाल संविधानिक व्यवस्थेचा पायमल्ली करीत आहेत. राज्यपाल हे फक्त भाजपचे आहेत काय? व्हीपवरून वाद होणार आहे. तो अद्याप मिटलेला नाही, असे नाना पटोले म्हणाले.