close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लातूर जिल्ह्यातील एकमेव चारा छावणी शासकीय मदतीविना

चारा छावणीला प्रशासनाने कसलीही मदत न केल्यामुळे नाराजी

Updated: May 18, 2019, 08:15 PM IST
लातूर जिल्ह्यातील एकमेव चारा छावणी शासकीय मदतीविना

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : गेल्या काही वर्षांपासून कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षीही भीषण दुष्काळ आहे. जिल्ह्यातील जनावरांच्या चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जैनमुनी विनम्रसागर महाराज यांची अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे ९७५ जनावरांची एकमेव चारा छावणी सुरु आहे. दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या चारा छावणीला प्रशासनाने कसलीही मदत न केल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

लातूर जिल्ह्यातही यावर्षी भीषण पाणीटंचाईचे चटके आहे. नागरिकांना घागरभर पाणी मिळविण्यासाठी राना-वनात फिरावे लागत आहे. त्यात जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करताना शेतकरी मेताकुटीला येत आहे. शेतकऱ्यांची हीच गरज लक्षात घेऊन जैनमुनी विनम्रसागर महाराज यांच्या दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २६ मार्च २०१९ पासून अहमपूर तालुक्यातील धसवाडी येथे चारा छावणी सुरु करण्यात आली. या चारा छावणीत अहमदपूर तालुक्यातील तब्बल ९७५ जनावरे आहेत. 

परिसरात चारा आणि पाणी नसल्यामुळे तीन जिल्ह्यातून चारा मिळवून कडबा कुट्टी करून तो जनावरांना दिला जातो. या छावणीमुळे आपली जनावरे वाचल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.  

जवळपास ६८ हजार रुपये दररोजचा खर्च या चारा छावणीला येतो आहे. त्यामुळे प्रशासनाने हातभार लावावा अशी वारंवार विनंती चारा छावणीचे प्रमुख संग्राम नागपूर्णे आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाला भेटून केली. मात्र आपल्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. इतका मोठा दुष्काळ असूनही प्रशासनाने हातवर केल्यामुळे ही छावणी चालविणे अवघड जात असल्याचे मत यावेळी छावणी प्रमुखांनी व्यक्त केलं आहे. तर मदत मिळवून देण्याची भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या छावणीला भेट दिल्यानंतर घेतली होती. 

एकूणच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच भेट दिलेल्या या छावणीला भेट दिल्याचे आश्वासन दिल्यानंतरही अद्याप प्रशासनाने याची कसलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता सरकारनेच या ९७५ पशु-धनाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून लक्ष घालावे अशी अपेक्षा पशुधन मालक असलेले शेतकरी करत आहेत.