Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर आलीय, मनोज जरांगे-पाटलांनी उपोषण प्रखर केलंय. आतापर्यंत एकटे जरांगे पाटील उपोषण करत होते, आता मात्र गावोगावी आपल्याला जरांगे-पाटील दिसतील. कारण राज्यभरात गावोगावी मराठा समाज थेट आमरण उपोषणाला बसणार आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी नेत्यांना शांततेच्या मार्गानं गावबंदी करण्यात आली होती, काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी पुढा-यांना अक्षरश फैलावर घेतलं. आता मात्र गावोगावी मराठा समाजाचं आमरण उपोषण सुरु होतंय.
देशातील आणि राज्यातील हे पहिलंच सामुहिक उपोषण असल्याचा दावा जरांगेंच्या वतीनं करण्यात आलाय. आता उपोषणाचं आंदोलन केवळ अंतरवाली सराटीपुरतं मर्यादित नसेल तर गावोगावी आमरण उपोषणाचा वणवा पेटणार आहे
आतापर्यंत एकट्या जरांगे-पाटलांनी सरकारची डोकेदुखी वाढवली होती आता मात्र हजारो मराठा बांधव जरांगेंच्या आवाहनानुसार गावोगावी आमरण उपोषण सुरु करतायत. त्यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्यात.
मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केलाय. मराठा आरक्षणावर राज्य सरकार साधक-बाधक विचार करतय. राज्य सरकार अत्यंत कळकळीनं या विषयावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल असंही सावंत म्हणालेत
मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केलीय. जरांगेंनी सरकारला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्याची मुदत संध्याकाळी संपली, त्यानंतर त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जे पंतप्रधानांना सांगत नाहीत, ते आरक्षण काय टिकवणार? पंतप्रधानही आरक्षणावर बोलत नाही, हीच काय मराठ्यांची किंमत? असा सवाल करत सगळ्या मराठा कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांपासून दूर व्हावं, असं आवाहन जरांगेंनी केलंय.
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील शनिवारी घोटभर पाणी प्यायले. शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या विनंतीवरून जरांगे पाटलांनी घोटभर पाणी प्राशन केलं. आशीर्वाद म्हणून आपण पाणी पितोय. मात्र, उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारनं टेन्शन घेऊ नये. आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण सुटत नसतं, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांना मराठा आंदोलनाचा फटका बसलाय. जयसिंग गायकवाड जरांगे-पाटलांच्या भेटीसाठी आले असता कार्यकर्त्यांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं. तसच त्यांना माघारी धाडलं.