मुंबई : चंद्रपूरचे माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे यांचे वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने चंद्रपुरात राहत्या घरी निधन झाले. दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऍड. साळवे 1967 ते 1978 असे 2 टर्म चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. ऍड. साळवे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
चंद्रपूरजवळ दुधोली-बामणी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात१९३७ मध्ये त्यांचा जन्म झाला. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी युवावस्थेत सामाजिक कार्याला प्रारंभ केला. चंद्रपूर आणि नागपूर न्यायालयात त्यांनी 1978 पासून वकिलीला सुरूवात केली.
टाडा कायद्यात गरीब, निरपराध आदिवासींना गोवण्यात आले तेव्हा त्यांच्या वतीने कोर्टात ठामपणे उभे राहत त्यांनी अन्यायाविरोधात आवाज बुलंद केला. समाजकारण करताना शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलितांना सिंचनासाठी पाणी सत्याग्रह करून तलाव व सिंचनाच्या सोयी उभ्या करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
१९९३ साली त्यांनी बौध्द धम्माचा स्विकार केला. फुले-आंबेडकर, मार्क्स-माओ तत्वज्ञानाचा अभ्यास त्याचा विशेष राहिला. विविध नियतकालिके- साप्ताहिके मासिकातुन त्यांनी विपुल लिखाण केले. ग्रामीण, कष्टकरी जनता, आदीवासी यांच्या अधिकाराचा संघर्ष लढताना अनेकवेळा तुरुंगवास-पोलिस कोठडी मिळाली. आपल्या प्रदीर्घ राजकारण-समाजकारण आणि कायदेशीर लढ्यात आलेले अनुभव त्यांनी पुस्तकरुपात शब्दबद्ध केले.
१) बहुजनांचा धर्म - बुद्ध धर्म
२) मी बौद्ध धम्म का स्विकारला?
३) सत्यशोधक आसुड शेतक-याचा
४) एनकाऊंटर - कादंबरी
५) भगवान बिरसा मुंडा- आदिवासी भूमिपुत्रांचा बुलंद आवाज... अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.
१९६७ या वर्षी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 'ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळाची' स्थापना करून ग्रामीण भागात शाळा- महाविद्यालयाचे जाळे निर्माण केले. सत्यशोधक किसान मंच या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबविले.
1992 साली तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षल्यानी अपहरण केल्यावर राज्य-देशात मोठा कल्लोळ झाला होता. हा गुंता सोडविण्यासाठी सरकार-नक्षली यांच्यात मध्यस्थी घडवून ऍड. साळवे यांनी आत्राम यांची सोडवणूक केली.