पुणे-नगर महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला, कंटनेरच्या धडकेत दोन वर्षाच्या मुलीसह चौघं जागीच ठार

Pune Nagar Accident: पुणे-नगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चौघांनी जीव गमावला आहे. अपघातात दोन वर्षाच्या मुलीनेही जीव गमावला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.   

Updated: Feb 21, 2023, 06:22 PM IST
पुणे-नगर महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला, कंटनेरच्या धडकेत दोन वर्षाच्या मुलीसह चौघं जागीच ठार title=

Pune Nagar Accident: पुणे-नगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) भीषण अपघात झाला आहे. कारेगावजवळ फलकेमळा येथे कंटेनर आणि कार यांच्यात हा भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात एका दोन वर्षाच्या चिमुरडीनेही आपला जीव गमावला आहे. सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. चालक अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले आहेत. 

अपघातातील सर्व कुटुंब हे बीड जिल्ह्यातील होतं. हे कुटुंब कारमधून जात असताना कंटनेरला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन वर्षाच्या चिमुरडीनेही आपला जीव गमावला असून यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून चाकणकडे चालले होते. दुपारी फलके मळ्याजवळ रस्त्यावर उभ्या कंटेनरवर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.