जेवणातून चौघांना विषबाधा, चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

संगमनेर येथे अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन सख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला.

Updated: Dec 10, 2019, 01:50 PM IST
जेवणातून चौघांना विषबाधा, चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

संगमनेर : येथे अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन सख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कृष्णा दीपक सुपेकर (६), श्रावणी दीपक सुपेकर (९) या दोघा भावंडांचा मृत्यू झाला. तर मोठी बहीण वैष्णवी दीपक सुपेकर (१३) हिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान, हा विषबाधेचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र नेमकी कशी काय विषबाधा झाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मूळचे नांदूर खंदरमाळ येथील दीपक गंगाधर सुपेकर कुटुंब कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहे. मोलमजूरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. ५ डिसेंबर रात्री नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सर्वांनी गुरुवारी उपवास सोडवत एकत्र जेवण केले. जेवणात डाळ-भात, बटाटा टोमेटो चटणी खाल्ली होती. जेवण झाल्यानंतर कृष्णा, श्रावणी, वैष्णवी आणि आजी भागीरथी गंगाधर सुपेकर या सर्वांना मळमळ, उलटयांचा त्रास होवू लागला. मात्र काही वेळाने त्यांना बरे वाटू लागले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार (६ डिसेंबर) सकाळी पुन्हा त्यांना त्रास होवू लागल्यानंतर चौघांनाही शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र कृष्णाची प्रकृती चिंताजनक होती. त्याचा रविवार सकाळी मृत्यू झाला. 

श्रावणी हिच्यावर लोणी येथे औषध उपचार सुरु असताना अचानक तिचीही प्रकृती खालावल्याने रविवारी रात्री आकाराच्या सुमारास तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजी भागीरथी गंगाधर सुपेकर यांची प्रकृती स्थिर असून मोठी मुलगी वैष्णवी हिच्यावर शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. 

दरम्यान, हा विषबाधेचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र नेमकी कशी काय विषबाधा झाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, वैष्णवी सुपेकर अतिसार, उलटी आणि थंडीताप आजारांमुळे हॉस्पीटलमध्ये औषधोपचार घेत आहे. विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉ. अतुल आरोटे यांनी दिली.